त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता कुंभमेळा प्राधीकरण; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
By संजय पाठक | Updated: February 26, 2025 18:35 IST2025-02-26T18:34:09+5:302025-02-26T18:35:31+5:30
कुंभमेळा कायदा देखील करण्यात येणार असल्याची दिली माहिती

त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता कुंभमेळा प्राधीकरण; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश
संजय पाठक, नाशिक- दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी कुंभमेळा प्राधीकरण स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मुंबई येथे कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी घेतलेल्या बैठकीत यांनी हे आदेश दिले. कुंभमेळ्याचे नियोजन, समन्वय आणि तसेच वेगाने कामे पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राधीकरणाची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे आता कुंभमेळा कायदा देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रयागराजमधील महाकुंभसाठी झालेली गर्दीची परिस्थिती पाहता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगाने जास्तीचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. भाविकांच्या सोयीसाठी ई बस ची सेाय करण्यात येणार आहे. मात्र, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर, ओझर या विमानतळावरही प्रवाशांचे नियोजन करावे. शिर्डी विमानतळावर विमाने थांबविण्यासाठी जागा वाढविण्यात यावी. तसेच ओझर विमानतळावरही अधिक विमानांचे लँडिंगसाठी सोय उपलब्ध करून द्यावी. नाशिक शहरात हेलिपॅड उभारता येतील का याचा विचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिले.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते.