हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:28 IST2018-12-20T01:28:36+5:302018-12-20T01:28:56+5:30
आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. पारा सुरुवातीला हळूहळू घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे.

हंगामातील सर्वांत कमी तापमानाची नोंद
नाशिक : आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली. पारा सुरुवातीला हळूहळू घसरू लागला; मात्र चार ते पाच दिवसांपासून झपाट्याने घसरण होऊ लागल्याने नाशकात थंडीचा जोर प्रचंड वाढला आहे. बुधवारी (दि.१९) पारा अचानकपणे ९.५ अंशांवरून थेट ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला. एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.
गेल्या सोमवारी (दि.१७) किमान तापमानाचा पारा ८.५ अंशांपर्यंत घसरला. या हंगामातील ही नोंद नीचांकी ठरली. आठवडाभरापासून नाशिककर वाढत्या थंडीने गारठले असून, तापमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या जवळपास स्थिरावत होता, मात्र सोमवारपासून पारा अधिक वेगाने खाली येऊ लागल्याने थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट पसरल्यानंतर उत्तर महाराष्टÑदेखील थंडीने प्रभावित झालेला पहावयास मिळत आहे. सोमवारपासून पारा झपाट्याने खाली आल्याने नाशिककर थंडीने कुडकुडत आहे. दिवसभर नागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. थंडीचा कडाका वाढताच शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले आहेत. एकूणच वाढत्या थंडीचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसून येत आहे. हाडं गोठविणारी थंडी सध्या नाशिककर अनुभवत आहेत. बुधवारी तर थंडीने कहरच केला. मंगळवारी रात्रीपासूनच थंड वारे अधिक वेगाने वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे बुधवारी पहाटे थंडीने हाहाकार उडवून दिला.