पुन्हा ‘नवनिर्माणावर बोलू काही...!’

By Admin | Updated: February 17, 2017 23:55 IST2017-02-17T23:55:17+5:302017-02-17T23:55:35+5:30

राज यांनी शब्द दिला जपून : संकल्पना जुन्याच, नवे मात्र काही नाही

Let's talk about 'renewal ...!' | पुन्हा ‘नवनिर्माणावर बोलू काही...!’

पुन्हा ‘नवनिर्माणावर बोलू काही...!’

नाशिक : पाच वर्षांपूर्वी हायटेक नवनिर्माणाचे स्वप्न दाखवत महापालिकेत सत्तेवर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आता नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वात ‘नवनिर्माणावर बोलू काही...’ असे म्हणत पुन्हा एकदा सत्तेची मैफल जमविण्याची धडपड चालविली आहे. लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या की काय होते, याचा अनुभव घेणाऱ्या राज यांनी पुन्हा नवनिर्माणाचा संकल्प सोडताना ‘शब्द’ मात्र जपून वापरले आहेत. त्यामुळे ‘विकासनामा’ अथवा ‘वचननामा’ या गुळगुळीत शब्दांना बाजूला ठेवत राज यांनी येत्या पाच वर्षांत काही संकल्पना साकारण्याचा शब्द दिला असला तरी त्यात नवे असे काही नसल्याने ‘शब्दांमधून ओघळले काही, त्यात नवे काहीच नाही’ असेच म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे.  महापालिका निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे दोन दिवस उरले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वाचा संकल्प प्रकाशित केला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. ‘माझा शब्द’ या शीर्षकाखाली नाशिकच्या नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वात नेमके काय असेल, याची झलक त्यात दाखविण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी विकासाची ब्ल्यू प्रिंट समोर ठेवत नवनिर्माणाचे स्वप्न दाखविणाऱ्या मनसेने आता मात्र स्वप्न दाखविताना हात आखडता घेतला आहे. त्यात बहुतांशी संकल्पना या जुन्याच असून, काही संकल्पना महापालिकेत यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत अथवा राबविण्यात येत आहेत. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत शहर बससेवा चालविण्यास अनुत्सुक असलेल्या मनसेने आता मात्र ‘शब्द’ फिरविला असून, सेना-भाजपाच्या सुरात सूर मिसळवित महापालिकेची बससेवा सुरू करण्याचे वचन दिले आहे. महापालिका हद्दीत जेनेरिक औषधांच्या दुकानांना विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, परंतु महापालिकेकडून अशा दुकानांसाठी यापूर्वीच महापालिकेच्या गाळ्यांसाठी सवलत देण्यात आलेली आहे. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह, बचतगटांसाठी स्वतंत्र विक्रीकेंद्र, पाळणाघरे या जुन्याच संकल्पना ‘नव्या’ म्हणून मांडण्यात आल्या आहेत. शहरात प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दाही जुनाच आहे. त्यावर गेल्या दोन वर्षांपासून कार्यवाही सुरू आहे. मुंबईत अनधिकृत झोपडपट्ट्यांविरुद्ध भूमिका घेणाऱ्या राज यांनी नाशकात मात्र झोपडपट्टीवासीयांना दूरवर हलवण्याऐवजी त्यांचे आहे त्यात ठिकाणी पुनर्वसन करण्याचा शब्द दिला आहे. महापालिका प्रशासनाने नगररचना विभागात ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुरू करत त्यादिशेने पाऊलेही उचलली आहेत. परंतु, मनसेने बांधकाम परवानग्या आॅनलाइन देणार असल्याचे सांगत कल्पनादारिद्र्य दर्शविले आहे. नदी विकास योजना, मनपाच्या आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर, मनपा शाळांमध्ये ई-लर्निंग, स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकऱ्या, आयटी उद्योगांना प्रोत्साहन, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मिनी थिएटर्स, आर्ट गॅलरी, डिजिटल वाचनालये, कालिदास-गायकवाड सभागृहाचे नूतनीकरण आदि शिळोप्याच्याच गप्पा पुन्हा एकदा मारल्या आहेत. त्यामुळे नवनिर्माणाचे दुसऱ्या पर्वात मनसेने शब्द देतानाही जपून दिला असून, त्यात नवे काहीच नाही. (प्रतिनिधी)
नवे मोजके, पण....
मनसेच्या नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वात अगदीच अपवादात्मक स्थितीत काही संकल्पना नव्या आहेत. त्यात घर जर कुटुंबातील महिलेच्या नावावर तसेच ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर असेल तर घरपट्टीत भरघोस सवलत देण्याचा शब्द देण्यात आला आहे. शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्यातील पाणी पिण्यायोग्य करण्यात येणार आहे. आयटीपार्कसाठी महापालिका जागा उपलब्ध करून देणार आहे. युवकांसाठी तंत्रशिक्षण केंद्र आणि महापालिकेच्या पुढाकाराने वार्षिक संगीत महोत्सव या काही बाबींचा नव्याने समावेश म्हणता येईल. परंतु, आर्थिक स्थितीशी झगडणाऱ्या महापालिकेच्या माध्यमातून या गोष्टी कितपत अंमलात येतील, याबाबत साशंकता आहे.
पुन्हा एकदा क्रीडा धोरण
मनसेच्या सत्ताकाळातच यतिन वाघ महापौर असताना महापालिकेने क्रीडा धोरण आखून ते मंजूर केले होते. सदर क्रीडा धोरण गेल्या तीन वर्षांपासून अंमलबजावणीसाठी शासनदरबारी पडून आहे. त्यासाठी मनसेने पाठपुरावा केल्याचे स्मरत नाही. मात्र, आता पुन्हा एकदा नवनिर्माणाच्या दुसऱ्या पर्वात क्रीडा धोरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. खेळाडूंना मनपा सेवेत सामावून घेण्याचा शब्द देतानाच उत्तम दर्जाचे क्रीडा संकुलही उभारण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Let's talk about 'renewal ...!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.