Video - नाशिकमध्ये द्राक्षाच्या मळ्यात बिबट्या फसला जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 13:00 IST2018-11-27T10:31:24+5:302018-11-27T13:00:42+5:30
नाशिकरोड जवळ चाढेगाव येथे द्राक्ष मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. सुटकेसाठी बिबट्याची झटापट सुरू असताना त्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांना ऐकू आल्या.

Video - नाशिकमध्ये द्राक्षाच्या मळ्यात बिबट्या फसला जाळ्यात
नाशिक : नाशिकरोड जवळ चाढेगाव येथे द्राक्ष मळ्यात डुकरांना पायबंद घालण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात मंगळवारी (27 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. सुटकेसाठी बिबट्याची झटापट सुरू असताना त्याच्या डरकाळ्या शेतकऱ्यांना ऐकू आल्या. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. नाशिक पश्चिम उपवनसंरक्षक टी. बिउला एलिल मती यांनी तत्काळ रेस्क्यू पथकाला घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. अवघ्या काही मिनिटांत वनविभागाचे अधिकारी कर्मचारी मळ्यात पोहोचले.
बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्याचे आव्हान वनविभागाच्या पथकापुढे उभे राहिले होते. मात्र बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठया कौशल्याने ट्रेनकुलाईझ गन ने डार्क देऊन बेशुद्ध केले. यशस्वीपणे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून बिबट्याला पिंजऱ्याद्वारे हलविण्यात आले आहे. दरम्यान, नाशिकरोड पोलीस पथक ही घटनास्थळी बघ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोहोचले होते. जाळ्यात बिबट्या फसल्याने तो जास्त आक्रमक झाला आहे. सुमारे पाच ते सहा तासापूर्वी तो जाळ्यात अडकला असावा असे बोलले जात आहे. नाशिकरोड जवळील सामनगाव, चाडेगाव, गोरेवाडी, एकलहरा रोड, पळसे या मळे भागत, मोकाट कुत्रे, डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्या द्राक्ष मळ्यात पोहचला असावा, असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान, या भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मळे भागात पिंजरा तैनात करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.