‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 20:27 IST2020-03-23T20:24:46+5:302020-03-23T20:27:14+5:30
नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे.

‘लालपरी’ची कोरोनामुक्तीच्या मार्गावर धाव; ६५ लाखांच्या महसुलावर पाणी
नाशिक : ‘कोरोना’चा आघात केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होत आहे; मात्र या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारचे विशेष प्रयत्न सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगार-१ला ६५ लाखांच्या उत्पन्नावर या आठवडाभरात पाणी सोडावे लागले आहे. एकूणच एसटी कोरोनामुक्तीच्या मार्गावर सध्या धावत आहे.
‘कोरोना’मुळे गेल्या आठवडाभरात नाशिक डेपो एकच्या १ हजार ९५८ फेऱ्या रद्द झाला असून, एसटी बसेसचा २ लाख किलोमीटरचा प्रवास थांबला आहे. त्यामुळे एसटी प्रशानाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नाशिक आगार एकमधून धावणाºया अनेक बसेसची चाके आठवडाभरापासून थबकली आहेत. रविवारी (दि.२२) झालेल्या ‘जनता कर्फ्यू’मध्ये एकही बस रस्त्यावर आली नव्हती. त्यामुळे एसटी नाशिक विभागाला एकाच दिवशी २२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी आदेश लागू केले. तसेच जिल्हाबंदी केल्यामुळे आता एसटीला ३१ मार्चपर्यंत ‘ब्रेक’ लागला आहे. लालपरी कुठल्याही गावाच्या वेशीवर पोहचणार नाही. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंतचा राज्याचा प्रवास बंद झाला आहे. एकूणच कारोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एसटीदेखील आपआपल्या ‘घरात’ थांबली असून, नागरिकांनीसुद्धा आता आपल्या घरातच थांबणे अवघ्या समाजाच्या हिताचे ठरणार आहे. सरकार व प्रशासनाकडून दिल्या जाणा-या सर्व सूचनांचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आपण एक जागरूक व सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडण्याची वेळ आली आहे.