'टेस्टिंग किट'अभावी नाशिकच्या लॅबचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 04:47 PM2020-05-24T16:47:33+5:302020-05-24T16:47:47+5:30

एप्रिलच्या अखेरीस नाशिकमध्ये करोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आली होती. तर महिन्याभरात तिचे कामकाज बंद पडल्याने पुन्हा पुण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

Lab in Nashik stalled due to lack of 'testing kit' | 'टेस्टिंग किट'अभावी नाशिकच्या लॅबचे कामकाज ठप्प

'टेस्टिंग किट'अभावी नाशिकच्या लॅबचे कामकाज ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देतीन दिवसात कामकाज पूर्ववत होणार

नाशिक : जिल्ह्यात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्याने कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोरोना विषाणू टेस्टिंग लॅबचे कामकाज शनिवारपासून ठप्प झाले आहे. टेस्टिंग किटचा अनिश्चित पुरवठा आणि नाशिकच्या लॅबला लागणारया विशिष्ट किटचा तुटवडा ही त्याची कारणे असल्याचे आरोग्य यंत्रणेचा दावा आहे.
नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांच्या तपासणी आणि अहवालासाठी नाशिकची कोरोना संशयित रुग्णांची लॅब मोलाची भूमिका बजावत होते. मात्र, त्याचे कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे तपासणी करण्यासाठी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज,पुणे या लॅबची मदत घ्यावी लागत असल्याने चाचणी अहवाल येण्यामध्ये गत दोन दिवसांपासून अधिक विलंब लागत आहे.
नाशिकला लॅब सुरू करण्यात यावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. त्यानंतर स्थानीक नेते आणि प्रशासनाकडून याबाबतचे प्रयत्न सुरु झाले. अखेर एम्सकडून या लॅबला परवानगी देण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही लॅब सुरु होणार असल्याचे चर्चा होती. मात्र, लॅबला एनएबीएलची मान्यता मिळवणे देखील अनिवार्य करण्यात आल्यामुळे काहीसा विलंब झाला. अखेर आयसीएमआरकडून युजरनेम व पासवर्ड मिळाल्यानंतर एप्रिलच्या अखेरीस नाशिकमध्ये करोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आली होती. तर महिन्याभरात तिचे कामकाज बंद पडल्याने पुन्हा पुण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

नाशिकमधील डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये लॅबची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली होती.नाशिकमध्ये कोरोना तपासणी लॅबला परवानगी मिळावी यासाठी सर्वत्र मागणी झाल्यानंतर ही लॅब सुरू झाली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने लॅबच्या परवानगीचे अधिकार पुणे आणि नागपूर केंद्राला दिले आहेत. त्यानुसार आय.सी.एन.आर च्या अधिकाऱ्यांनी मविप्र येथील मेडिकल कॉलेजच्या लॅबची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाहणी करून कार्यान्वित करण्याचे आदेश दिले होते. तसेच यासाठी लागणाऱ्या मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञांना नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.

टेस्टसाठी लागणारे विशिष्ट किट्स उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या 2-3 दिवसात त्या उपलब्ध झाल्यावर पुन्हा नाशकात काम सुरू होईल. तोपर्यंत आपण नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवत आहोत.
-डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Lab in Nashik stalled due to lack of 'testing kit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.