मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट दोन टप्प्यात राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:28 IST2025-02-22T14:28:04+5:302025-02-22T14:28:12+5:30
मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 2 टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट दोन टप्प्यात राहणार बंद
शाम धुमाळ
मुंबईनाशिक महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 6 दिवस सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुढील सहा दिवस जर या मार्गाने प्रवास करणार असाल तर तुम्हाला थोड्या त्रासाला सामोरं जाण्याची शक्यता आहे.
मुंबईनाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 2 टप्प्यात पुढील 6 दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वा या वेळेत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे.
24 फेब्रुवारी 2025 ते 27 फेब्रुवारी 2025 या कालावधीत तसेच 3 मार्च ते 6 मार्च या दरम्यान जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्ती व पावसाळ्याच्या पूर्वतय्यारी साठी कसारा घाटातून नाशिककडे जाणारी वाहतूक दिवसभरासाठी बंद करण्यात येणार असून या दरम्यान नाशिक दिशेकडे जाणारी वाहतूक नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असून यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला समोरे जावे लागेल.
अवजड वाहणांना 6 दिवस पूर्णपणे बंदी
जुना कसारा घाट दुरुस्ती दरम्यान बंद असणार असल्याने लहान वाहणाची वाहतूक नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार आहे परंतु या दरम्यान या मार्गांवरून अवजड वाहनांना पूर्ण पणे बंदी घालण्यात आली असून ओडिसीसारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या मार्गे वळविण्यात येणार आहेत.
वाहनचालक, प्रवाशी यांनी प्रवासाचे करावे नियोजन
दरम्यान कसारा घाटातील रस्ते दुरुस्ती व त्यामुळे वळविण्यात येणारी मार्गिका लक्षात घेता मुंबई नाशिक शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी कसारा पोलीस, महामार्ग पोलीस घोटी केंद्र,महामार्ग पोलीस शहापूर केंद्र,आपत्ती व्यवस्थापन टीम नवीन कसारा घाटात कार्यरत असून नवीन कसारा घाटात ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व मदत केंद्र उभारली जाणार आहेत. जुन्या कसारा घाटातील डोकावणाऱ्या दरडी, जुनी महाकाय वृक्ष देखील या कालावधीत काढावीत त्यामुळे भविष्यात म्हणजेच पावसाळ्यात त्रास होणार नाही अशी मागणी आपत्ती व्यवस्थापन सदस्याकडून करण्यात येत आहे.