त्रितालातील तीस्त्र तबला सहवादनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:48 IST2019-12-13T23:34:12+5:302019-12-14T00:48:00+5:30
पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

तबलाभिषेक-२०१९च्या चौथ्या पुष्पात तबलाविष्कार सादर करताना सारंग तत्त्ववादी, राधिका रत्नपारखी दुर्गेश पैठणकर यांच्यासह संवादिनीवर साथसंगत करताना ईश्वरी दसककर.
नाशिक : पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे. कुसुमाग्रज स्मारकात शुक्रवारी (दि.१३) ‘तबलाविष्कार २०१९’चे चौथे पुष्प अकादमीच्या युवा तबलावादकांसह डॉ. अविराज तायडे यांच्या शिष्यांचे गायन व कल्याणी दसककर यांच्या शास्त्रीय गायनाने रंगले. तत्पूर्वी आर्किटेक्ट संजय पोरवाल, संगीता पोरवाल, मनीषा अधिकारी व ज्योती देवगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ. अविराज तायडे यांची शिष्य रिया पोंदे हिने राग बागेश्रीचा गायनाविष्कार सादर केला. तर दिशा दाते हिने राग कलावती, ओकार कडवे याने राग ओडव बागेश्री आणि मानसी सबनीस यांनी भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना संस्कार जानोरकर यांनी संवादिनीवर तर गौरव तांबे यांनी तबल्यावर साथसंगत केली.