भाजपासाठी ठरणार अस्तित्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:13 IST2021-09-25T04:13:48+5:302021-09-25T04:13:48+5:30
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० मधील भागात शशिकांत जाधव हे मनसेकडून दहा वर्षे आणि भाजपाकडून पाच वर्षे असे ...

भाजपासाठी ठरणार अस्तित्वाची लढाई
सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक १० मधील भागात शशिकांत जाधव हे मनसेकडून दहा वर्षे आणि भाजपाकडून पाच वर्षे असे १५ वर्षांपासून नेतृत्व करीत आहेत.मागील निवडणुकीत मनसेला जय महाराष्ट्र करीत जाधव यांच्यासह सुदाम नागरे,माधुरी बोलकर,पल्लवी पाटील हे चारही उमेदवार भाजपाची उमेदवारी घेऊन निवडून आले होते. यात मनसेच्या एका उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. भाजपाच्या विरोधात शिवसेना,मनसे,राष्ट्रवादी,माकपा,काँग्रेस या राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. मतविभागणीचा फायदा भाजपाच्या उमेदवारांना झाला होता. या भागात भाजपाचे फारसे अस्तित्व नव्हते. पण, त्यावेळी विक्रम नागरे यांनी भाजपात प्रवेश करुन भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना आणून काही प्रमाणात पक्षाचे अस्तित्व निर्माण केले होते. मागील निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या वर्षभरात सुदाम नागरे यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत नागरे यांच्या पत्नी इंदुबाई नागरे विजयी झाल्याने भाजपाचा गड शाबूत राहिला आहे.
यंदा या प्रभागातील प्रत्येक भागात इच्छुक उमेदवारांची संख्या खूप आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांना पक्षाची उमेदवारी मिळत नसल्याने बंडखोरी ठरलेली आहे. यात ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत जाधव यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ते पुन्हा भाजपाची उमेदवारी करतील की, अन्य पक्षात जातील याविषयी प्रभागात चर्चा सुरू आहेत. त्यातच महाविकास आघाडी झाल्यास भाजपाला धक्का बसू शकतो.
इच्छुक :-
भाजपा :- शशिकांत जाधव, विक्रम नागरे, माधुरी बोलकर,पल्लवी पाटील, मंगल खोटरे, रामहरी संभेराव, गणेश बोलकर, इंदूबाई नागरे
शिवसेना :- माजी नगरसेवक नंदू जाधव,मंदाकिनी गवळी,समाधान देवरे,धीरज शेळके,शांताराम कुटे,नरेश सोनवणे,
राष्ट्रवादी :- बाळासाहेब जाधव,धनंजय रहाणे,दत्ताजी वामन,संदीप पवार,इंद्रभान सांगळे,क्रांती पालवे,कपिल भावले,प्रवीण नागरे,पूनम शाह
मनसे :- प्रा.अंबादास अहिरे, इंद्रभान सांगळे,विशाल भावले,मयूर शिंदे, जितेंद्र कुलथे
काँग्रेस :- विजय तिवडे,अमोल सूर्यवंशी,रमेश शेवाळे, वैशाली थोरात,चंद्रकांत निर्वाण
कोट..
प्रभागात रस्ते,लाईट,पाण्यासाठी झगडावे लागत आहे. या प्रभागात डेंग्यू,चिकुनगुन्या,मलेरिया सारख्या साथरोग आजाराचा फैलाव रोखण्यात अपयश आले आहे. प्रभागातील मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम अतिशय संथगतीने होत असल्याने सतत अपघात घडत आहेत. विकासाची कोणतीही मोठी कामे झालेली नाहीत.
- मंदाकिनी गवळी, पराभूत उमेदवार.
प्रमुख समस्या :
- धोकेदायक विद्युत तारा भूमिगत करण्यात अपयश
- प्रभागातील उद्यानांची दुरवस्था
- अंतर्गत रस्ते डांबरीकरण झालेले नाहीत
- प्रभागात डेंग्यू,चिकुनगुन्या,मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव
---
छायाचित्र- शशिकांत जाधव आणि नंदू जाधव