"तुमची कार सुरक्षित आहे का? चोरटे आता 'हॅकिंग' करून काही मिनिटांत पळवतायत महागड्या गाड्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:40 IST2026-02-25T12:39:12+5:302026-02-25T12:40:15+5:30
गाड्या चोरणारे चोरही आता हायटेक झाले आहेत.

"तुमची कार सुरक्षित आहे का? चोरटे आता 'हॅकिंग' करून काही मिनिटांत पळवतायत महागड्या गाड्या!
नाशिक: चारचाकींमध्ये दिवसेंदिवस अद्ययावत तंत्रज्ञान येत आहे. स्मार्ट फीचर्सच्या या कार पारंपरिक पद्धतीने चावी अथवा लॉक तोडून पळविणे शक्य नाही. मात्र, असे असले, तरी चोरट्यांच्या टोळ्याही हायटेक झाल्या आहेत. सिस्टीम हॅक करून अत्यंत महागड्या कार चोरीस गेल्याच्या घटना महानगरांमध्ये घडत आहेत. शहरात वर्षभरात ११ कार चोरीस गेल्या असून, त्यातील तीन ते चार कार सिस्टीम 'हॅक' करून चोरीस गेल्या आहेत. नाशिक पर्यटनासाठी आलेल्या दोन भाविकांच्या कार गोदाघाटावरून लंपास झाल्या होत्या. शहरातील अनेक भागात महागड्या कार सोसायटीबाहेर रात्रभर पार्क केल्या असतात.
आगामी कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील भाविक येतील. अनेक भाविक कारने दाखल होतील. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाने पुरेपूर कार आव्हान कारचालकांसमोर असेल. त्यामुळे जास्तीत जास्त अधिकृत पार्कीग स्थळ कुंभमेळ्यापूर्वी विकसीत करण्यात येत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले.
नाशिकमध्ये प्रमाण कमी, तरी घ्या काळजी
नाशिकमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रात्री पोलिसांची पेट्रोलिंग, तसेच कारचालकाकडून घेतली जात असलेली काळजी यामुळे शहरात कारचोरीचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके असले, तरी इतर महानगरांप्रमाणे येथेही कारचोरीचे लोण वाढू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
महागडी कार दारात आहे? झोपेत राहू नका
महागडी कार दारात असताना तिची देखील चोरी होऊ शकते, ही कल्पना बाळगा अन् कार चोरी होणार नाही यासाठी उपाय शोधा.
हायटेक चोरट्यांचे पोलिसांना आव्हान
तज्ज्ञांच्या मते, आधुनिक वाहनांमध्ये सेन्सर लॉक, स्मार्ट की, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट व पोर्ट असतो. या तंत्रज्ञानाचा गैरवापर करून चोरटे काही मिनिटांत वाहन सुरू करू शकतात. ओबीडी पोर्टद्वारे नवीन की प्रोग्राम करणे, रिमोट लॉक सिग्नल जॅमरने वाहन लॉक न होऊ देणे, किंवा आधीच मिळवलेली डुप्लिकेट की वापरणे असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वाहन मालकाला चोरीची कल्पनाही येत नाही.
कार पार्क करताना काय काळजी घ्याल?
नो पार्किंग झोनमध्ये गाडी लावू नका, दंड होऊ शकतो. सीसीटीव्ही किंवा सुरक्षारक्षक असलेल्या ठिकाणी कार पार्क करा. गाडी बंद करून हँडब्रेक आवर्जून लावा. मॅन्युअल कार असेल तर, उतार असल्यास पहिला गीअर आणि चढाव असल्यास रिव्हर्स गीअरमध्ये गाडी ठेवा, गाडीतून उतरताना सर्व खिडक्या व्यवस्थित बंद आहेत की नाही ते तपासा आणि दरवाजा लॉक करा.
टेक्नोसॅव्ही चोरांकडून अशी होते कार चोरी
कार चोरीत दिल्ली, चिनी बाजारपेठेत उपलब्ध ओबीडी डिव्हाइस, रिलेबॉक्सचा वापर केला जातो.
किटद्वारे कारचा इंजिन कोड स्कॅन करून लॅपटॉपच्या साहाय्याने विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने कारच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टममध्ये प्रवेश मिळवला जातो.
स्थानिक टोळ्या एकाच वेळी बोनटमधील वायरमध्ये बदल करूनही दरवाजा उघडतात.
ओबीडी डिव्हाइस कारला कनेक्ट केले जाते. त्यानंतर कारचे सेन्सर, जीपीएसचे नियंत्रण चोरांच्या हाती जाते.
त्यानंतर बनावट चावीने कार स्टार्ट करून तत्काळ राज्याबाहेर पसार होतात.