इंदिरानगरला विहिरीत बुडून वृध्देसह तरूण मृत्यूमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 15:06 IST2019-03-26T15:04:03+5:302019-03-26T15:06:59+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरूष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

इंदिरानगरला विहिरीत बुडून वृध्देसह तरूण मृत्यूमुखी
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पुरूष व महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पहिल्या घटनेत मेट्रो झोन गृहप्रकल्पाच्या पाठीमागे असलेल्या काळे यांच्या शेतातील विहिरीत जवळच राहणाऱ्या किरण राजू मोरे (३४) यांचा मृतदेह त्यांचा भाऊ किशोर मोरे यांना तरंगत असल्याचे आढळून आले. त्यांनी घटनेची माहिती तत्काळ इंदिरानगर पोलिसांना कळविली. मयत किरण हा मागील दोन दिवसांपासून घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध घेत असताना मृतदेह विहिरीत आढळून आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास हवालदार भामरे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत पाथर्डीगावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या भंडुबरा नावाच्या विहीरीत सीताबाई मुरलीधर गवळी (८०) या वृध्देचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सीताबाई यांना स्मृतीभं्रशचा आजार होता, त्या मारूती मंदीराजवळ पाथर्डीगावात राहत होत्या. स्मृतीभ्रंश असल्यामुळे त्यांनी विहीरीत उडी घेतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी वैशाली संतोष शिंदे यांनी पोलिसांनी घटनेची खबर दिली. इंदिरानगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.