गोदापार्कमध्ये कोयता, चाकू फिरवला अन् दोघा गुंडांच्या हाती बेड्या पडल्या!
By अझहर शेख | Updated: October 10, 2023 15:01 IST2023-10-10T15:00:42+5:302023-10-10T15:01:04+5:30
शहर व परिसरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची काही महिन्यांपुर्वी स्थापना केली आहे.

गोदापार्कमध्ये कोयता, चाकू फिरवला अन् दोघा गुंडांच्या हाती बेड्या पडल्या!
नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयाच्या दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने ‘दणका’ देत पंचवटीतून दोघा सराईत हद्दपार गुन्हेगारांना कोयता, चाकूचा धाक दाखविताना रंगेहाथ जाळ्यात घेतले. मिळालेल्या गुप्त बातमीवरून पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. त्यांची अंगझडती घेतली असता कोयता व चाकू आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहर व परिसरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दरोडा व शस्त्र विरोधी पथकाची काही महिन्यांपुर्वी स्थापना केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तडीपार, हद्दपार केलेले गुन्हेगार शहरात शस्त्र घेऊन वावरतात का? याबाबत गोपनीय माहिती काढून त्यांना बेड्या ठोकण्याची जबाबदारी या पथकाकडे सोपविण्यात आली आहे. साध्या वेशातील हे पथक शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत फिरून कारवाई करू शकते. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांनी बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.
यानुसार पथकातील अंमलदार गणेश चव्हाण यांनी गुप्त माहिती काढून संशयित सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ बादल पवन वाघ (२३), अक्षय विरसिंग वाघेरे (२३,दोघे रा.,रा.उदय कॉलनी, क्रांतीनगर) यांना सापळा रचून बेड्या ठोकल्या. रामवाडी येथील गोदापार्क चिंचबन परिसरात हे दोघे संशयित गुन्हेगारा कोयता, चाकू घेऊन मिरवत दहशत पसरवित होते. यावेळी साध्या वेशातील या विशेष पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.