"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:27 IST2025-08-23T17:26:51+5:302025-08-23T17:27:05+5:30
मनसेच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये या परप्रांतीय व्यक्तीचा समाचार घेतला.

"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
नाशिक - मुंबई, ठाण्यात सुरू असलेला मराठी आणि परप्रांतीय वाद आता नाशिकमध्ये पोहचला आहे. याठिकाणी वाहन शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने एका कारला धडक दिली. त्यानंतर स्वत:च अरेरावी करत मराठी भाषिकांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातील पीडित मराठी कुटुंबाने मनसे पदाधिकाऱ्यांकडे त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये या परप्रांतीय व्यक्तीचा समाचार घेतला.
नाशिकच्या जय भवानी रोडवरील हा प्रकार आहे. याबाबत मनसे पदाधिकारी नितीन पंडित म्हणाले की, एका परप्रांतीयाने मराठी कुटुंबाच्या वाहनाला धडक दिली. यावर नुकसान भरपाई न देता उलट त्या कुटुंबावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. तुम मराठी लोग भंगार हो, तुम्हारी गाडी भंगार है अशा मुजोरी शब्दात वाद घातला. त्यानंतर हा प्रकार आमच्या कानावर आला. आम्ही तिथे पोहचलो, तेव्हा तो उर्मटपणे बोलू लागला. मी मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करा अशी भाषा वापरली. त्यानंतर मनसे स्टाईलने आम्हाला समज द्यावी लागली असं त्यांनी सांगितले.
पीडित कुटुंबाने काय म्हटलं?
तुम मराठी लोग भंगार है, तुमच्या कार भंगार आहेत अशी भाषा त्याने वापरली. तो त्याच्या श्रीमंतीचा माज दाखवत होता. आम्हाला शिवीगाळ करू लागला. कुणाकडे जायचे तिथे जा, पैसे देत नाही असं बोलला त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर मी मनसेच्या लोकांना हे सांगितले असं मराठी कुटुंबाने म्हटलं. याबाबत सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आम्ही मनसेकडे गेलो. त्यांनी आम्हाला तातडीने मदत केली असं कुटुंबाने सांगितले.