नाशकात बिबट्यानं शेतमजूराला फरफटत ऊसाच्या शेतात नेलं; दोन दिवसांनी आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 22:25 IST2022-05-23T22:25:26+5:302022-05-23T22:25:42+5:30
शहराच्या पश्चिमेला गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांपासून जवळ असलेल्या गिरणारे शिवारात बिबट्याचे हल्ले सुरूच आहे.

नाशकात बिबट्यानं शेतमजूराला फरफटत ऊसाच्या शेतात नेलं; दोन दिवसांनी आढळला मृतदेह
नाशिक :
शहराच्या पश्चिमेला गंगापूर, आळंदी या दोन्ही धरणांपासून जवळ असलेल्या गिरणारे शिवारात बिबट्याचे हल्ले सुरूच आहे. या भागात पुन्हा एका शेतमजुरावर बिबट्याने झडप घेत त्याला फरफटत शेतात नेले. या हल्ल्यात अरूण हिरामण गवळी (२७,रा.अलीवपाडा, हरसूल) हा मृत्यूमुखी पडला आहे. त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात हल्ल्याच्या दोन दिवसानंतर सोमवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास आढळून आला. महिनाभरानंतर बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा हा दुसरा बळी गेला आहे.
याबाबत वनखात्याकडून मिळालेली माहिती अशी, मुळ हरसूल भागातील रहिवाशी असलेले आदिवासी शेतमजूर गिरणारे पंचक्रोशीत रोजंदारीने शेतीच्या कामासाठी मुक्कामी स्थलांतरीत झाले आहेत. येथील टमाटा मार्केटच्या मागे असलेल्या ऊसाच्या शेतात बिबट्याने अरुण गवळी या मजुरावर दोन दिवसांपुर्वी हल्ला केला. या हल्ल्यात अरूणचा मृत्यू झाला. तो बेपत्ता असल्यामुळे सर्वत्र त्याचा शोध घेतला जात होता. मात्र काहींना वाटले की तो गावाकडे परतला असेल, म्हणून त्याच्यासोबत असलेल्या मजूरांनी तालुका पोलिसांना कळविले नाही.
दरम्यान, आज सकाळी येथील शेतात निम्म्यापेक्षा अधिक प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत दिलीप काशिनाथ थेटे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३५४मधील शेतात अर्धवट खाल्लेला पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. दुपारनंतर सुमारास पोलीस, वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या शेतमजुरांनी हा मृतदेह अरूणचा असल्याचे ओळखले. पोलीस, वनविभागाने जागेवर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला.