कोर्टात भोंदूबाबा खरात म्हणाला, जादूटोणा केला नाही!; आर्थिक व्यवहार, गुन्ह्याची व्याप्ती मोठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 05:47 IST2026-03-25T05:47:13+5:302026-03-25T05:47:13+5:30
बंदुकीतील गोळ्यांबाबत तपास सुरू; पाच दिवसांची कोठडी वाढवली

कोर्टात भोंदूबाबा खरात म्हणाला, जादूटोणा केला नाही!; आर्थिक व्यवहार, गुन्ह्याची व्याप्ती मोठी
लोकमत न्यूज नेटवर्कस नाशिक : भोंदू अशोक खरातकडून हस्तगत करण्यात आलेल्या बंदुकीतील ५ गोळ्यांचा वापर त्याने नरबळीसाठी अथवा, कोणाला धमकावण्यासाठी केला की, वन्यप्राण्यांना मारण्यासाठी केला, याचा तपास बाकी असल्याने खरातला सत्र न्यायाधीश ए. एच. पाटील यांनी आणखी ५ दिवसांची कोठडी दिली.
मंगळवारी खरातची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले गेले. त्यात दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने हा निर्णय दिला. खरात याच्या फार्महाऊसवर २१ काडतुसे सापडली. त्यात पाच वापरलेली काडतुसे असून, ती कशासाठी वापरली, हा नवीन मुद्दा उपस्थित करीत सरकार पक्षाकडून पोलिस कोठडीची मागणी केली गेली.
मी पोलिसांना तपासात सर्व माहिती दिलेली आहे. काहीही लपवलेले नाही. मी केवळ पूजा करीत होतो. कोणताही जादूटोणा मी केलेला नाही. इतक्या दिवसांपासून मी तेच सांगतो आहे. पूजेला शंभर दीडशे लोक असायचे. श्रावण आणि महाशिवरात्रीलाच मी तिकडे जात होतो.
आणखी एका पिडितेची तक्रार...
भोंदूबाबा खरातविरोधात सहा गुन्हे दाखल झाले दाखल झाले असताना मंगळवारी (दि. २४) आणखी एका पीडितेने पोलिसांकडे आपबिती कथन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता गुन्ह्यांची संख्या सातवर जाणार आहे.
कोर्ट रूम लाइव्ह : असा झाला युक्तिवाद
एसआयटी अधिकारी सूर्यवंशी : खरातकडे आढळलेले रिव्हॉल्व्हर आणि वापरलेली काडतुसे याचा तपास बाकी आहे. त्याचा वापर नरबळीसाठी झाला, धाक दाखविण्यासाठी झाला की, प्राण्यांची शिकार करण्यासाठी झाला, याचा शोध घ्यावा लागणार आहे. अनेक पीडित तक्रार देण्यास पुढे येत आहेत. त्याच्या तपासासाठी कोठडी वाढवून मिळावी.
सरकारी वकील शैलेंद्र बागडे : आरोपीकडून आतापर्यंत ६ लाख ५३ हजार रुपये जप्त, लॅपटॉपसह काही वस्तू, डीव्हीआर ताब्यात घेतले आहे. मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. त्याच्या गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी असल्याचे समोर आले आहे. हा तपास करण्यासाठी आणखी ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी.
आरोपीचे वकील : ज्या मोडस ऑपरेंडीचा आरोप केला जातोय, त्याचा तपास करण्यास आधीचे ७ दिवस पुरेसे होते. काही आरोप हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसते. संशयिताकडून पैसे, मालमत्तेची कागदपत्रे, डीव्हीआर सर्व जमा करण्यात आले. संशयिताकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरला अधिकृत परवाना आहे. आता पोलिस कोठडी देऊ नये.
सरकारी वकील बागडे : रिव्हॉल्व्हरचे लायसन्स असले तरी ते कुठेही वापरण्याचा अधिकारी कोणाला दिलेला नाही. याशिवाय अनेक पीडिता आता तक्रार करायला पुढे येत आहेत. खरात अघोरी पूजा कशी करायचा हे बघायचे आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. प्रॉपर्टीसह आर्थिक व्यवहारही तपासायचे आहेत. त्यासाठी पुन्हा ७ दिवसांची कोठडी गरजेची आहे.
पीडितेचे वकील : हा गुन्हा क्रूरतेचा कळस आहे. त्याचा पूर्ण तपास होऊन आरोपीला त्याच्या गैरकृत्याची शिक्षा मिळण्यासाठी सखोल तपास गरजेचा असून, त्यासाठी पोलिस कोठडीची गरज आहे.
यासाठी मिळाली पोलिस कोठडी...
५ काडतुसे कशासाठी आणि कुठे वापरल्या याचा शोध, नरबळी अथवा प्राण्यांचा बळी दिल्याची शक्यता आहे. अनेक महिला खरातविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत असल्याने त्याबाबत अधिक चौकशी करावी लागेल. आर्थिक व्यवहारात झालेली अनियमितता तपासण्यासाठी अधिक चौकशीची गरज आहे. कोणती पूजा कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने करण्यात आली हे तपासले जाणार आहे.
दबाव आणणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही : मुख्यमंत्री
खरात याने धार्मिक विधी, मंत्र-तंत्र व अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार, अश्लील कृत्य केल्याचे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल. पोलिसांवर दबाव आणणाऱ्या किंवा हस्तक्षेप करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.