Illegal recovery in suburban markets | उपनगरीय बाजारांत अवैध वसुली
उपनगरीय बाजारांत अवैध वसुली

नाशिक : शहराच्या आजूबाजूला असलेल्या रिंगरोडच्या परिसरांमधील नव्याने उदयास आलेल्या उपनगरे, कॉलन्यांच्या परिसरात भरणाऱ्या दैनंदिन बाजारांमध्ये अज्ञात टोळक्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना ‘स्वच्छता वसुली पावती’ (कोरी करकरीत) हातात देत प्रत्येकी दहा रुपयांची ‘वसुली’ करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिका, पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आठवडे बाजाराची संकल्पना काळानुरूप बदलली आहे. कारण शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने आठवडे बाजारदेखील उपनगरांनुसार वाढले आहे. गोदाघाटावर भरणाºया बाजाराव्यतिरिक्त मेरी, म्हसरूळ, निलगिरी बाग, साईनगर, कोणार्कनगर, अमृतधाम चौफुली, रासबिहारी लिंकरोड, पाथर्डीफाटा आदी भागांमध्ये रिंगरोडच्या कडेला मोकळ्या भूखंडांवर बाजाराचे दिवस ठरलेले आहेत. या बाजारांमध्ये किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांपासून स्वयंपाकगृहात लागणाºया वस्तू विक्रेत्यांपर्यंत विविध किरकोळ विक्रेत्यांकडून दुकाने थाटली जातात. मनपाच्या ताब्यातील भुखंडांवर जरी बाजार भरत असला तरी या बाजारात विक्रेत्यांकडून ‘स्वच्छता कर’ वसूल करणारी टोळी मात्र अज्ञात आहे. कारण या टोळीकडून नियमितपणे प्रत्येकी दहा रुपये
विक्रेत्यांकडून घेतले जातात आणि त्यांच्या हातात एसटीच्या तिकिटाच्या आकाराची कोरी करकरीत पावती दिली जाते. या पावतीवर दर दहा रुपये, जागा, ठिकाण, दि., वसुली कारकुनाची सही अशी काही अक्षरे छापील स्वरूपात आहे; मात्र या अक्षरांच्या रकान्यात कुठल्याही-प्रकारची माहिती अथवा स्वाक्षरी, शिक्का नसल्याने विक्रेत्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ‘दैनंदिन बाजार स्वच्छता वसुली पावती’ म्हणजे काय रे बुवा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्येक बाजारात शेकडोंच्या संख्येने विक्रेते अवघे काही तास आपला व्यवसाय करतात. विक्रेत्यांकडून दहा रुपये ‘कर’वसूल केला जातो. ही करवसुली करणारी अज्ञात टोळी रोज आपल्या खिशात मात्र हजारो रुपयांची रक्कम सहज टाकून घेत आहे.
‘वसुली कारकून’ नेमका कोण?
‘तुम्ही बाकीचे काही बोलू नका, स्वच्छता कर म्हणून मनपाला दहा रुपये द्यायचे जिवावर येते का’ असा प्रतिप्रश्नही विक्रेत्यांना वेळेप्रसंगी ‘टोळी’कडून ऐकावा लागतो. स्वच्छता कर अथवा जागेचे वाजवी शुल्क अधिकृत स्वरूपात मनपाने वसूल केल्यास त्यास विक्रेत्यांची कुठलीही हरकत नाही; मात्र कोरी करकरीत ‘दैनंदिन बाजार स्वच्छता पावती’ हातात देत अवैधरीत्या प्रत्येक विक्रेत्याकडून दहा रुपये वसूल करणारे नेमके कोण? असा प्रश्न शेकडो विक्रेत्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title:  Illegal recovery in suburban markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.