मला सासरच्यांनी जाळले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:14 IST2018-03-31T01:14:31+5:302018-03-31T01:14:31+5:30
शहरातील पिंपळेश्वर रोड परिसरात २३ मार्चच्या रात्री घडलेल्या विवाहिता जळीतकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गर्भपात करत नाही म्हणून नवरा, दीर आणि सासरा यांनी संगनमत करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या रूपाली विलास कुमावत या महिलेने आता असे काहीच घडले नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि सटाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मला सासरच्यांनी जाळले नाही
सटाणा : शहरातील पिंपळेश्वर रोड परिसरात २३ मार्चच्या रात्री घडलेल्या विवाहिता जळीतकांड प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. गर्भपात करत नाही म्हणून नवरा, दीर आणि सासरा यांनी संगनमत करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा आरोप करत संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिलेल्या रूपाली विलास कुमावत या महिलेने आता असे काहीच घडले नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि सटाणा पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामुळे पोलीसही आता बुचकळ्यात पडले आहेत. नवरा, दीर आणि सासरा यांचा या प्रकरणात काहीही सबंध नसून स्वयंपाक करत असताना माझ्या साडीचा पदर गॅसला लागल्याने हा प्रकार घडल्याचे तिने आता म्हटले आहे. माझा जबाब पुन्हा पोलिसांनी नोंदवून घ्यावा, अशी मागणीही रूपाली कुमावत हिने केली असून कोर्ट कचेरीच्या फंदात पडण्याची माझी इच्छा नसल्याचे तिने निवेदनात म्हटले आहे. २३ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास रूपाली विलास कुमावत ही महिला गंभीर भाजली होती. तिच्या आईने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करून रूपालीने गर्भपात करण्यासाठी नकार दिल्याचा राग आल्याने नवरा विलास कुमावत, दीर योगेश कुमावत आणि सासरा दशरथ कुमावत यांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची फिर्याद दिल्याने राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरु होती. या प्रकरणातील तीनही आरोपी फरार असतांना पीडित रूपाली कुमावत हिने या प्रकरणी गौप्यस्फोट केला आहे.माझ्या जळण्याचा आणि पती, दीर आणि सासरा यांचा सबंध नसून मी गॅसवर स्वयंपाक करतांना माझ्या साडीचा पदर गॅसला लागला. साडी पेटल्याचे पाहून मी पळत पळत गल्लीत आल्याने हवेने साडीने पेट घेतला माझ्या आईने मला विझवील्याचेही निवेदनात म्हटले आहे. माझे पती आणि सासरा माझा व्यवस्थित सांभाळ करत असून उपचारासाठीदेखील ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे तिने निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
माझ्या मुलीची अशी घटना घडल्यानंतरदेखील तिचा पती घटनास्थळी लवकर आला नाही म्हणून रागाच्या भरात तिने त्यांनीच हे कृत्य केल्याची फिर्याद पोलिसांना दिली असल्याचे रूपाली कुमावतच्या आईने म्हटले असून, तिचा पती, सासरा सासू रूपालीचा काळजीपूर्वक सांभाळ करत असल्याची प्रतिक्रिया रूपालीची आई आक्काबाई हीने दिली आहे. आता या प्रकरणात पोलिस काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.