प्रचाराचा गलबला संपला, आता वेळ विचारपूर्वक निर्णयाची!

By किरण अग्रवाल | Published: October 20, 2019 02:17 AM2019-10-20T02:17:52+5:302019-10-20T02:22:01+5:30

प्रचाराचे मैदान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सर्वच उमेदवारांनीही गाजवून झाले आहे. सर्वांचेच म्हणणेही ऐकून झाले आहे. आता विचारपूर्वक मतनिश्चिती करून मताधिकार बजावायची वेळ आली आहे. आपले हे ‘मत’च आपल्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणार असल्याने, त्यादृष्टीने सद्सद्विवेकास स्मरून मतदान करूया...

The hype is over, now is the time to make a wise decision! | प्रचाराचा गलबला संपला, आता वेळ विचारपूर्वक निर्णयाची!

प्रचाराचा गलबला संपला, आता वेळ विचारपूर्वक निर्णयाची!

googlenewsNext
ठळक मुद्देस्वच्छ व धडाडीचे प्रतिनिधी निवडूयाचला मताधिकार बजवूया

सारांश

निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्याने, आतापर्यंत सर्वच राजकीय पक्ष व अपक्षांकडूनही जे जे काही सांगून झाले आहे त्यावर विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. विकासाच्या बाबतीत एरव्ही प्रत्येकच जण वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त करीत असतात, त्या पूर्ण करतानाच, आपले प्रश्न विधिमंडळात मांडून ते सोडवून घेऊ शकणारा आपला प्रतिनिधी निवडण्याची ही वेळ आहे, त्यादृष्टीने सुजाण व जबाबदार नागरिकाचे कर्तव्य निभावण्यासाठी उद्या सोमवारी (दि.२१) मतदान करणे गरजेचे आहे.

निवडणूक कोणतीही असो, त्याकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून आपण पहात असतो. या उत्सवात सहभागी होऊन मताधिकार बजावणे म्हणजे आपल्या लोकशाही व्यवस्थेला अधिक मजबूत करणेच असते. व्यवस्थेच्या नावाने खडे न फोडता आपला प्रतिनिधी आपण निवडून पाठविण्याची ही व्यवस्था आहे. त्यासाठी मतदार ‘राजा’ म्हणवतो. मतदाराला हा राजधर्म निभावण्याचीच संधी निवडणुकीतील मतदानाच्या निमित्ताने मिळत असते. विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये ४५ लाखांपेक्षा अधिक मतदारांना ही संधी लाभणार आहे.

जिल्ह्यात निवडणूक रिंगणात एकूण १४८ उमेदवार असून, सर्वाधिक १९ उमेदवार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आहेत. त्या पाठोपाठ नांदगावमध्ये १५, तर मालेगाव (मध्य) मध्ये १३ उमेदवार आहेत. सर्वात कमी पाच उमेदवार दिंडोरीमध्ये लढत आहेत. सर्वच ठिकाणच्या सर्वपक्षीय व अपक्ष उमेदवारांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेत आपली उमेदवारी कशासाठी हे जनता जनार्दनास सांगितले आहे. यंदा प्रारंभी प्रचारात फारसा वेग नव्हता, कारण प्रमुख पक्षीय उमेदवारांच्या घोषणाही काहीशा उशिरा झाल्या होत्या. पण, उमेदवारी करायचीच हे निश्चित असलेल्यांनी अगदी लोकसभेच्या निवडणुकीपासूनच आपल्या प्रचाराची रंगीत तालीम करून ठेवली होती. अर्थात, प्रचाराच्या उत्तरार्धाच्या टप्प्यात मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, ‘मनसे’चे नेते राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी आदी मान्यवरांच्या जाहीर सभांनी निवडणुकीचा माहौल चांगलाच तापवला. त्यामुळे आता विचारमंथनातून ‘मतनिश्चिती’ करून स्वच्छ व धडाडीचा प्रतिनिधी निवडून पाठवण्यासाठी मताधिकार बजवायचा आहे.

विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वात जिल्हा निवडणूक यंत्रणेने पुरेशा वेळेआधी खबरदारी घेत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. मतदार याद्यांची तपासणी करीत सुमारे ५६ हजार दुबार व मयत नावे कमी करण्यात आली असून, नवीन मतदार नोंदणीअंतर्गत जिल्ह्यात २४ हजार युवक पहिल्यांदा मतदान करणार आहेत. महिला मतदारांची संख्याही वाढली आहे. युवक व महिलांची स्वत:ची आपली मते आहेत. स्वयंप्रज्ञेने, विचाराने ते राजकारणाकडे व लोकप्रतिनिधींच्या कामकाजाकडे बघताना दिसून येतात. घरातील कर्त्यांच्या सांगण्यावरून नव्हे, तर आपल्या मताने ते निर्णय घेऊ लागले आहेत. तेव्हा त्यांचा एकूणच राजकारणातील वाढता रस लक्षात घेता, यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा गैर ठरू नये.

गेल्यावेळी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ६४ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालेले होते. दिवसेंदिवस मतदारांमधील जाणीव जागृती वाढली आहे, नवीन तरुण पिढी पुढे आलेली आहे, शिवाय दिव्यांग, आदी मतदारबांधवांकरिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तृतीयपंथीय मतदारांचे प्रमाण कमी असले तरी तेदेखील मतदानासाठी उत्सुक दिसत आहेत. त्यामुळे यंदा मतदानाचे प्रमाण वाढायला हवे. त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करायला हवी. मताचे मोल अनमोल असून, ते पवित्र कर्तव्य मानले जात असल्याने, कुठल्याही प्रलोभनाला वा धाक-दडपशाहीला न जुमानता हा हक्क बजावला जाईल, याकडे सुजाणांनी लक्ष द्यायला हवे. शासकीय यंत्रणा यासंदर्भात परिश्रम घेत आहेतच, सुज्ञ नागरिक म्हणून आपणही यंत्रणेला सहकार्य करूया. स्वत: मतदानासाठी बाहेर पडूया व अन्य सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहित करून, या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊया इतकेच यानिमित्ताने.

Web Title: The hype is over, now is the time to make a wise decision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.