पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून आई-वडिलांसह पती वाझदाच्या गेस्टहाऊसमध्ये होता मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:55 IST2025-05-26T12:51:13+5:302025-05-26T12:55:27+5:30
गुंडाविरोधी पथकाने गुजरातच्या वाझदामधून तिघांना ठोकल्या बेड्या : प्रेमविवाह केला; पतीचे विवाहबाह्य संबंध उघड होताच पत्नीचा सुरू केला छळ

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करून आई-वडिलांसह पती वाझदाच्या गेस्टहाऊसमध्ये होता मुक्कामी
नाशिक : सिरीन मेडोजमधील विवाहिता भक्ती अथर्व गुजराथी (३३, रा. सम्राट ट्रॉपिकॅनो) हिने पती, सासू-सासऱ्यांकडून सतत होणाऱ्या छळाला कंटाळून गेल्या आठवड्यात राहत्या घरात गळफास घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून तीनही संशयित पळून गेले होते. गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने नवसारी जिल्ह्यातील एका रेस्ट हाऊसमधून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण राज्यभरात गाजत असताना गंगापूररोडवरील नाशिक शहरातील सिरीन मेडोज या उच्चभ्रू वसाहतीतदेखील विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याची संतापजनक घटना घडली आहे. गुजराथी कुटुंबीयांकडून त्यांच्या सुनेचा २०१७सालापासून वेगवेगळ्या कारणांनी छळ केला जात होता. माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत त्यासाठी दबाव टाकला जात होता. तसेच सासू सासन्यऱ्यांना आंतरजातीय मुलगी सून म्हणून मान्य नव्हती तर संशयित अथर्व गुजराथी याचे विवाहबाह्रा संबंधांसह बँकॉकच्या पटायामधील 'कृत्या'बाबत जेव्हा पत्नी भक्तीला समजले, तेव्हा त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. अथर्व हा तिला पर स्त्रियांसोबत घालवलेल्या क्षणांची छायाचित्रे काढून पाठवत मानसिक त्रास देत होता. तसेच मद्यप्राशन करून घरात मारहाण करत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. या छळाला कंटाळून भक्ती हिने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेतला होता. ही धक्कादायक घटना तिच्या आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांनी नाशिक शहरात धाव घेतली. तिचे वडील फिर्यादी दिलीप प्रभाकर माडीवाले यांनी सोमवारी (दि. १९) रात्री गंगापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, तेव्हापासून गायब झालेले संशयित अथर्व योगेश गुजराथी (३५), योगेश मनीलाल गुजराथी, मधुरा योगेश गुजराथी या तिघांना वाझदा पोलिस ठाणे हद्दीतील हॉटेल, लॉजमधून ताब्यात घेतले आहे. या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी रविवारी (दि. २५) न्यायालयाने सुनावली.
शालेय जीवनापासून मैत्री तरी वितुष्ट...
अथर्व व भक्ती हे येवल्यामध्ये मोठे झाले. त्यांची घरेदेखील जवळजवळ होती. दोघेही शालेय जीवनापासून एकमेकांना ओळखत होते. ते चांगले मित्र बनले आणि पुढे मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन २०१७ साली दोघेही विवाहबंधनात अडकले. त्यांचा हा प्रेमविवाह सासू-सासऱ्यांना खटकला होता. त्यामुळे सुनेसोबत त्यांचेही पटत नव्हते आणि सतत वाद होत राहायचे, असे तपासातून समोर आले आहे. अथर्व हा व्यवसायानिमित्ताने बाहेरील राज्यात व देशांत दौऱ्यावर गेल्यानंतर तेथे 'रंगेल'चाळे करत ते फोटो काढून पत्नीला पाठवत होता. यामुळे त्यांच्यात वाद वाढून विकोपाला पोहोचले होते.
गुजरातच्या जंगलात लावले जाळे!
गुंडाविरोधी पथकाला पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी शोध घेण्याचे आदेश दिले होते. पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याप्रकरणी तपासचक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने 'लोकेशन' ट्रेस होताच मोहिते यांनी वरिष्ठांना कळवले. यानंतर त्वरित त्यांनी मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण यांचे पथक तयार करत गुजरातच्या दिशेने धाव घेतली. नवसारी जिल्ह्यातील वाझदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुजरात वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) वन जमिनीवर उभारलेल्या वनील उद्योग, नौताड नावाच्या पर्यटक निवासात अथर्व दडून बसला होता. तेथून त्याला पथकाने जाळ्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली व मोबाइल तपासले असता आई-वडिलांचे लोकेशन सापडले.
भक्ती थांबली माहेरी...
सासू-सासऱ्यांसह पतीकडून केल्या जाणाऱ्या छळामुळे भक्ती ही माहेरी निघून गेली होती. हा छळ असह्य झाल्याने तिने माहेर गाठून आपली आपबिती आई-वडील व भावाला सांगितली. भक्तीच्या आई-वडिलांनी तिला माहेरी येवल्यात आणले होते. तिला लहान मुलगादेखील आहे. त्यानंतर पती अथर्व याने भक्तीच्या आई-वडिलांकडे मी तिला आस देणार नाही, असे सांगत पुन्हा नांदायला नाशिक येथे घेऊन गेला. तरीही त्याच्या वागणुकीत कुठलाही बदल झाला नाही आणि शेवटी भक्तीने जीवनप्रवास थांबवला.
आई-वडिलांना ठेवले सुरक्षित अंतरावर!
वाझदाच्या जंगलापासून सुमारे २० ते २५ किलोमीटरवर असलेल्या वाझदा शहरातील एका हॉटेलच्या लॉजिंगमध्ये त्याने आई-वडिलांना ठेवले होते. त्यांना तेथे कारमधून (एमएच १५ जेएम ७४२१) सोडल्यांनतर अथर्व हा जंगलातील गेस्ट रूमवर येऊन राहात होता. पोलिसांना कुणकुण लागल्यानंतर आपण पकडले गेलो तरी आई, वडिलांपर्यंत पोलिस पोहोचणार नाहीत, या उद्देशाने अथर्व याने त्यांना 'सुरक्षित' रीत्या लांब ठेवले होते, असे तपासातून पुढे आले आहे.
गळफास घेतल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. भक्त्ती तिचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणींसोबत तिने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाबाबत मेसेजेस केले आहेत. याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे. त्यांचाही जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या प्रकरणात पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पद्मजा बढे, सहायक पोलिस आयुक्त