Nashik Crime: नाशिक येथील अंबड जवळच्या चुंचाळे गावाच्या परिसरात मंगळवारी (दि. १९) मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा चालक असलेल्या पतीने आपल्या पत्नीचा झोपेतच ओढणीच्या साह्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर स्वतःही साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला. चेतन नाना माडकर (३३), स्वाती चेतन माडकर (२७) असे मयत झालेल्या दांपत्याची नावे आहेत.
चेतन माडकर हा त्याची पत्नी स्वाती माडकर व त्यांच्या तीन मुलांसह पंचवटीतील फुलेनगर येथे राहत होता. चेतन हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करीत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. दारू प्यायल्यानंतर अनेकदा घरी आल्यानंतर त्याचे पत्नीशी वाद होत होते. सतत होत असलेल्या वादाला कंटाळून स्वाती हिने त्याचे घर सोडून चुंचाळे या भागात आईच्या घरी मुलांसह राहण्यासाठी गेली होती. परंतु यानंतरही चेतन माडकर तिला व मुलांना भेटण्यासाठी तिच्या आईच्या घरी जात होता. काही दिवसानंतर स्वातीच्या आईने चेतन आता चांगला वागत असल्याचे सांगितले. यानंतर स्वातीच्या सांगण्यावरून पती चेतन याने स्वातीची आई राहत असल्याच्या घराजवळच भाड्याची खोली घेऊन त्यांनी पुन्हा संसार सुरू केला. मात्र चेतन याला सतत दारूचे व्यसन असल्याने तो घरी आल्यानंतर नेहमीच पत्नी स्वातीशी वाद घालत असे.
सोमवारी रात्री देखील पतीने घरी आल्यानंतर दारूच्या नशेत पत्नी स्वातीबरोबर वाद घातला. यानंतर मध्यरात्री पत्नी तसेच घरातील त्यांची तीन मुले झोपलेले असताना चेतन याने पत्नीचा झोपेतच गळा आवळला. यामुळे स्वातीचा मृत्यू झाला. यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत स्वाती ह्या घराजवळच एका खासगी कंपनीत काम करून तीन मुलांचा सांभाळ करत होती. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चेतन याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.