बापरे! बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे शेकडो कोटींचे व्यवहार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 12:54 PM2022-03-30T12:54:12+5:302022-03-30T12:55:24+5:30

नाशिक - नवीन कामगार कायदे आणि बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक , पोस्ट ऑफिस कर्मचारी व विविध कामगार संघटनांनी ...

Hundreds of crores of transactions stalled due to two-day bank strike | बापरे! बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे शेकडो कोटींचे व्यवहार ठप्प

बापरे! बँकांच्या दोन दिवसीय संपामुळे शेकडो कोटींचे व्यवहार ठप्प

Next

नाशिक - नवीन कामगार कायदे आणि बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील बँक, पोस्ट ऑफिस कर्मचारी व विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय संपाला नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, कामगार कृती समितीसह बँक कर्मचारी कृती समितीतर्फे मंगळवारी (दि. २९) शहरातील गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निदर्शने करीत काढलेल्या रॅलीतून केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात निषेध व्यक्त केला. दरम्यान, दोन दिवसांत शहरासह जिल्हाभरात सुमारे सातशे ते आठशे कोटींचे व्यवहार ठप्प झाले. ऐन मार्चअखेरच्या कालावधीत बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या कामांसाठी मनस्ताप सहन करावा लागला.

नाशिक शहर व जिल्हाभरात बँक कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी शनिवारी (दि. २६) आणि रविवारी (दि.२७) साप्ताहिक सुट्टीमुळे बँका बंद होत्या. त्यानंतर संपामुळे सोमवारी (दि. २८) व मंगळवारी (दि. २९) बँका संपामुळे बंद राहिल्याने प्रत्यक्ष बँकांद्वारे चालणारे विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार सलग ४ दिवस ठप्प झाल्याने नागरिकांसह उद्योग-व्यावसायिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. बुधवारपासून (दि. ३०) बँकांमध्ये नियमित कामकाज सुरू होणार असले तरी मार्चअखेरची कामे करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी होणार आहे. दरम्यान, दोन दिवसाच्या या संपात देशभरातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रमुख संघटना सहभागी झाल्या असून, संपात सहभागी कर्मचाऱ्यांच्या बँकांमधील चेक क्लिअरन्स रखडल्याचे दिसून आले. काही ग्राहकांनी सलग चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प झाल्याने नेट बँकिंग आणि एटीएमसह मोबाइल बँकिंगचा पर्याय आजमावत महत्त्वाचे कामकाज पूर्ण केल्याचे दिसून आले.

३५० शाखांमधील तीन हजार कर्मचारी सहभागी

नाशिक शहरासह जिल्हाभरातील विविध बँकांच्या ३५० शाखांमधील तीन हजार कर्मचारी सोमवारी व मंगळवारी दोन दिवसीय संपात सहभागी झाले. यात अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या नाशिक शाखेने शहरात गोल्फ क्लब येथे कर्मचाऱ्यांतर्फे निदर्शने करून छत्रपती शिवाजी स्टेडियमपर्यंत रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

 

Web Title: Hundreds of crores of transactions stalled due to two-day bank strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.