कर्मचारी महासंघाचे तासभर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:26 IST2021-10-30T01:25:47+5:302021-10-30T01:26:08+5:30
नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना कायम ठेवावी तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) इगतपुरीत एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

इगतपुरी पंचायत समिती आवारात कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनप्रसंगी डॉ. लता गायकवाड, सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे यांना मागणीचे निवेदन देताना प्रमोद ठाकरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दीपक पगार, भास्करराव घावटे, नंदू सोनवणे, श्रीमती वैशाली सोनवणे,ज्ञानेश्वर कऱ्हाळे आदी.
घोटी : नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना कायम ठेवावी तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) इगतपुरीत एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांबाबत घोषणाबाजी करून शासनाचे लक्ष वेधले गेले. आंदोलनात राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रीय पेन्शन योजना हटाव दिन पाळण्यात आला. यावेळी राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच योजना लागू करावी, राज्य सरकारनेही याबाबत केंद्राकडे शिफारशीसह प्रस्ताव सादर करावा. एनपीएसधारक कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या १४ टक्के अंशदान रकमेची वजावट आयकरासाठी एकूण वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, सन २००५ पूर्वीच्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्वीकारलेल्या तसेच नोव्हेबर २००५ पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्त आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे पत्र गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड व सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे यांना देण्यात आले.
इन्फो
पदाधिकाऱ्यांना साकडे
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद ठाकरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष दीपक पगार, भास्करराव घावटे, नंदू सोनवणे, श्रीमती वैशाली सोनवणे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे आदींनी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे आदी पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनदरबारी लक्ष घालण्याची विनंती केली. या ठिय्या आंदोलनात ज्ञानेश्वर पाटील अमोल भामरे, संभाजी मार्कंडेय, किरण आहिरे,गणेश गतीर, संतोष बैरागी, श्रीमती पाटील, धांडे नामदेव गोडे आदी सहभागी झाले होते.