गृहस्वप्न येतेय सर्वसामान्यांच्या आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 23:57 IST2020-09-09T23:57:26+5:302020-09-09T23:57:56+5:30
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या गृहबांधणी क्षेत्राला गेल्या सुमारे वर्षभरापासून मंदीचा सामना करावा लागत आहे.

गृहस्वप्न येतेय सर्वसामान्यांच्या आवाक्यात
नाशिक : सुमारे वर्षभरापासून मंदीच्या सावटाखाली असलेल्या बांधकाम क्षेत्राला गती देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये आणि स्थानिक संस्था कर अधिभार (एलबीटी सेस)च्या रकमेमध्ये सूट जाहीर करून सर्वसामान्यांना आपले गृहस्वप्न साकारण्याच्या अगदी निकट आणले आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत घरांच्या खरेदीला वेग येऊन या क्षेत्रामधील मंदी नष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या गृहबांधणी क्षेत्राला गेल्या सुमारे वर्षभरापासून मंदीचा सामना करावा लागत आहे. राज्याच्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे तयार असून, त्यांना खरेदीदारच लाभत नसल्याने बांधकाम व्यावसायिक चिंतातुर झाले होते. त्यातच मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे बांधकाम व्यवसाय तर ठप्पच झाला होता.
अडचणीमध्ये सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी विविध संघटनांद्वारे गेले वर्षभर केली जात होती. राज्य सरकारने आता घर खरेदीसाठी लागत असलेल्या मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली आहे. याशिवाय ३१ डिसेंबरपर्यंत एलबीटीही माफ केला आहे. त्यामुळे आता घर खरेदी करणे हे स्वस्त होणार आहे.
शहरी भागासह ग्रामीण भागाला देण्यात आलेली ही सवलत मर्यादित काळासाठी असली तरी त्यामुळे आपले स्वत:चे घर असावे, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांच्या अपेक्षांची पूर्ती त्यामुळे दृष्टिपथामध्ये येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे सरकारच्या महसुलामध्ये घट होत आहे. या सवलतीमुळे अधिक लोक घर खरेदीसाठी पुढे येतील आणि त्यामुळे सरकारकडे जमा होणारे मुद्रांक शुल्क वाढून सरकारच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. हा सरकारच्याही दृष्टीने लाभदायक ठरणारा मुद्दा आहे. बाजारामध्ये चलन फिरू लागले की हळूहळू बाजारामध्येही तेजीचे वातावरण यावयास लागेल. (क्रमश:)
शहरी व निमशहरी भाग
च्३० लाखांच्या फ्लॅटसाठी ( शुल्क कमी होण्यापूर्वी) भरावे लागणारे शुल्क : २ लाख १० हजार रुपये.
च्याच फ्लॅटसाठी दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरावे लागणारे शुल्क : १ लाख २० हजार रुपये.
च्दि. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च, २०२१ पर्यंत भरावे लागणारे शुल्क : १ लाख ५० हजार रुपये.
ग्रामीण भाग
च्३० लाखांच्या फ्लॅटसाठी ( शुल्क कमी होण्यापूर्वी) भरावे लागणारे शुल्क : १ लाख ८० हजार रुपये.
च्याच फ्लॅटसाठी दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत भरावे लागणारे शुल्क : ९० हजार रुपये.
च्दि. १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च, २०२१ पर्यंत भरावे लागणारे शुल्क : १ लाख २० हजार रुपये.
जानेवारी ते मार्च या कालखंडामध्ये मुद्रांकशुल्क थोड्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. त्यामुळे ज्यांना आता तातडीने पैशांची व्यवस्था करून घराचे बुकिंग करता येणार नाही, त्यांना काही प्रमाणात सवलतीसाठी पुढील तीन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. सवलतीमुळे घरांची नोंदणी लवकर होणार असून, त्यामुळे बांधकाम क्षेत्रालाही मंदीमधून बाहेर पडण्याला हातभार लागणार आहे.