नाशिक : भाजपच्या जागा जास्त आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच असेल. गृहमंत्रिपदावरून आमच्यात वाद नाही. गृहमंत्रिपद सांभाळणे सोपे काम नाही. मी गृहमंत्री असताना गँगवार सुरू होते. त्यामुळे मला त्याची जाणीव आहे. कोण कुठे दंगल करतो, कुठे गुन्हे घडतात याची सर्व माहिती घेत त्यावर नियंत्रण ठेवणे सोपे काम नसल्याचे उद्गार अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काढले.
सोमवारी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह व्यग्र असल्याने मंत्रिमंडळाच्या शपथविधीला विलंब झाला. मंत्रिपदांवरून आमच्यात कोणताही वाद नाही. गृहमंत्रिपदाची मागणी शिंदेसेनेकडून होत असल्याचे विचारल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
‘...तर आमच्याही १०० जागा निवडून आल्या असत्या’
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना, गुलाबराव आमच्याबरोबर नसते तर आमच्याही १०० जागा आल्या असत्या असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य अभ्यासानंतरच केले असेल असे भुजबळ म्हणाले.
‘महिला मुख्यमंत्रीबाबतही निर्णय शक्य’
भाजपमधून महिला मुख्यमंत्री करण्याचा विचार आहे का असे विचारले असता, देशात महिला राष्ट्रपती, पंतप्रधान झाल्या आहेत. त्यामुळे महिला मुख्यमंत्रीबाबतही निर्णय होऊ शकतो, अशी शक्यताही भुजबळ यांनी व्यक्त केली.