पुरुषोत्तम राठोड
घोटी : जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तालुक्यातील जलसिंचन योजना तसेच धरणातील मुबलक पाण्यामुळे बागायती क्षेत्रांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. घोटीत तांदुळावर अत्याधुनिक प्रक्रिया केल्या जात असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
इगतपुरी तालुक्यात भात, नागली, वरई व मका हे प्रमुख पिके असून, वेळेवर आलेल्या पावसामुळे मागील वर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील एकूण ३२ हजार २८२ हेक्टर क्षेत्र असून, त्यात भात पिकाचे ३० हजार २४१ हेक्टर क्षेत्र आहे. ४७८ हेक्टर नागली, ६४५ हेक्टर वरई, ७५ हेक्टर मका पेरला गेला आहे. सद्यस्थितीत पाऊस मुबलक प्रमाणात असून, उत्पन्नवाढीसाठी पोषक आहे. भात उत्पन्नवाढीसाठी व परंपरागत शेतीला फाटा देत काही भागात भात लागवडीसाठीची नवीन पद्धत उदयाला आली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी नव्या पद्धती अवलंबल्या असून, उत्पन्नवाढीसाठी या पद्धतीचा मोठा फायदा होत आहे.
भात पिकासाठी शासकीय पातळीवर १५ हजार हेक्टरी विमा सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकरीवर्गाचे गट तयार करून तीन उत्पादन कंपन्या स्थापन केल्या असून, त्यांना शासनाकडून ३५ टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. उत्पन्नवाढीवर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले असून, विविध योजनांसाठी शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुख्य हंगाम संपल्यानंतर रब्बी पिकांसाठी धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याने तालुक्यातील वैतरणा, वाकी खापरी, भाम, दारणा, भावली धरणालगतची क्षेत्र तसेच पूर्वेकडील मोठे क्षेत्र भात शेतीनंतर मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शेतीचा अवलंब करतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पन्न काढले जाते.
इन्फो
भाजीपाल्याचा मुंबई, ठाण्याला पुरवठा
खरीप हंगामानंतर इगतपुरी तालुक्यातील अंदाजे नऊ हजार हेक्टर उत्पन्न भाजीपाल्यासह फ्लॉवर, काकडी, टमाटे, ढोबळी, मिर्ची, आले, कारले, बटाटे याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असून, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मुंबई, ठाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वर्षभर माल पुरवठा सुरू असतो. दिवसेंदिवस मालाची उपलब्धता वाढत असल्याने शेतकरी व विकत घेणाऱ्यांसाठी मार्केट उपलब्ध करून देण्यात आले असल्याने घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीवरील ताण वाढत आहे.
इगतपुरी तालुक्यात भातासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रक्रिया व साठवणूक सुविधासाठी गोडाऊन शासन पातळीवर उपलब्ध करून दिली जात असून, मालाची उपलब्धता अधिक वाढल्यास त्याची गरज पडते अन्यथा साठवण प्रक्रियाकरिता कांदा चाळी कृषी विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
कोट :
घोटीच्या तांदळाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून, योग्य प्रकारे ब्रॅण्डिंग व चांगल्या अत्याधुनिक प्रकारे प्रक्रिया केली तर इगतपुरी तालुक्याजवळ मुंबई आर्थिक राजधानी जवळ असल्याने या तांदळाला राज्याबाहेरील बाजारपेठेत आपल्याला मांडता येईल. प्रक्रिया उद्योगावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनी शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून शेतीबरोबरच उद्योग क्षेत्रात आपली पाळेमुळे बळकट करण्यास मदत होईल.
- शीतलकुमार तंवर ( कृषी अधिकारी, इगतपुरी)
फोटो- २० इगतपुरी कृषी
200921\20nsk_39_20092021_13.jpg
फोटो- २० इगतपुरी कृषी