हृदयद्रावक! जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची बाईकला धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:53 IST2025-01-07T16:53:12+5:302025-01-07T16:53:42+5:30
टनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.

हृदयद्रावक! जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकची बाईकला धडक; अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
Nashik Accident: मनमाड - चांदवड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सोमवारी सायंकाळी मोकाट जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन्हीही विद्यार्थी मनमाड येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दहावी इयत्तेत शिकत होते. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काही काळ रास्ता रोको आंदोलन केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास मक्याचा भुसा घेऊन जाणारा सोळा चाकी ट्रक (क्रमांक एमएच १८ बीजी ६६८१) चांदवडहून मनमाडकडे येत असताना मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेली मोकाट जनावरे अचानक उठली. या जनावरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रकने पुढे जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच ४१ एन १३९८) जोरदार धडक दिली. वैष्णवी प्रवीण केकाण (१५) आणि आदित्य मुकेश सोळसे (१५, दोघेही रा. हनुमाननगर, मनमाड) हे डोणगाव रस्त्यावरील स्वामी विवेकानंद विद्यालयातील दहावीचे विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून जात होते. दुचाकीला ट्रकने जबर धडक दिल्याने अपघातात या दोन्ही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत ट्रकचालक राकेश दादाजी खैरनार यास ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. सदर अपघात रस्त्यावरील मोकाट जनावरांमुळे घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, मोकाट जनावरांचा प्रश्न त्यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
शाळेत शोककळा
दोन्ही विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शाळेवरही शोककळा पसरली. स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. डी. साळुंखे यांनी हा प्रसंग अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत मंगळवारी (दि. ७) शाळेचे कामकाज बंद ठेवून विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार असल्याचे सांगितले. परिसरातील नागरिक राजेंद्र माळी यांनी सदर रस्त्याचे काम अपूर्ण स्थितीत असल्याचे सांगत दोन्ही बाजूने होणाऱ्या अतिक्रमणामुळेही अपघातांमध्ये भर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिले.