परीक्षार्थीचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉल तिकिटावर शुद्धलेखन चुका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:14+5:302021-09-25T04:14:14+5:30
नाशिक : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधील पदे भरतीसाठी शनिवारी (दि. २५) आणि रविवारी ...

परीक्षार्थीचे ‘आरोग्य’ बिघडले; हॉल तिकिटावर शुद्धलेखन चुका!
नाशिक : राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील गट क आणि गट ड मधील पदे भरतीसाठी शनिवारी (दि. २५) आणि रविवारी (दि. २६) लेखी परीक्षा होणार आहे. परीक्षेची सर्व तयारी पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांना हॉलतिकिटांचेदेखील वाटप करण्यात आले आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे याही वेळी अनेक परीक्षार्थीच्या हॉलतिकिटावर विविध चुका आढळून येत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटावर परीक्षा केंद्रांचा पत्ता
चुकीचा दिसत आहे. तर काही हॉलतिकिटांवर परीक्षा केंद्र किंवा इतर माहिती देताना स्पेलिंग चुकीचे छापले गेले आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना याविषयी माहिती असली तरी परीक्षेसाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. नाशिकमधील एका विद्यार्थ्याला सटाणा येथील ताहाराबाद रोडवरील परीक्षा केंद्र मिळाले आहे. मात्र, त्याच्या हॉलतिकिटावर ‘जहाराबाद रोड’ असे छापून असून सटाणा नावाचे स्पेलिंगदेखील चुकीचे आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या नावातदेखील चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
--------
क गटासाठी एकूण केंद्र : ९४
परीक्षार्थी : ३३ हजार ९६८
------
ड गटासाठी एकूण केंद्र : ५६
परीक्षार्थी : १८ हजार ३१
---------
तीन सत्रात परीक्षा
आरोग्य विभागातील क गटासाठी शनिवारी सकाळ सत्रात दहा ते बारा तर दुपार सत्रात तीन ते पाच अशा दोन सत्रात परीक्षा होईल. तर ड गटासाठी रविवारी दहा ते बारा या वेळेत परीक्षा होईल. दोन्ही दिवस मिळून एकूण तीन सत्रात परीक्षा होणार आहे.
----
हॉल तिकिटावर स्पेलिंगच्या चुका
बहुतांश विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर परीक्षा केंद्रांचा पत्ता देताना स्पेलिंगच्या चुका आढळून येत आहेत. काही चुका किरकोळ असल्याने अंदाज येऊ शकतो. मात्र, काही चुका गंभीर स्वरूपाच्या असल्याने पत्ता नेमका कुठला आहे, याविषयी संभ्रम निर्माण होतो. किरकोळ चुकांमध्ये स्थानिक परीक्षार्थी अंदाज लावू शकतात. मात्र, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
---------
परीक्षार्थी चिंतेत
मला सटाणा येथील ताहाराबाद परीक्षा केंद्र मिळाले आहे. मात्र, माझ्या हॉल तिकिटवर सटाणा नावाचे स्पेलिंग चुकीचे छापून आले असून ताहाराबाद रोड ऐवजी ‘जाहाराबाद रोड’ असे लिहिले आहे. मला त्या परिसराची माहिती असल्याने मी समजून घेतले, मात्र, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो.
- पंढरीनाथ पाटील, परीक्षार्थी
--------
शहरात आणि आजूबाजूला जवळच परीक्षा केंद्र असून मला दिंडोरी परीक्षा केंद्र मिळाले. अनेक परीक्षार्थींबाबत असे घडले आहे. उपलब्ध असून जवळचे केंद्र न मिळाल्याने प्रवासखर्च वाढणार आहे. त्यामुळे यापुढे शक्य असल्यास जवळील केंद्र मिळावे.
- ज्ञानेश्वर पगार, परीक्षार्थी
----------- फोटो : आरला आहे -----------