लिपिकाची परीक्षा द्यायला गेला अन् फसला; हायटेक कॉपीचा डाव उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 07:23 IST2023-09-24T07:22:55+5:302023-09-24T07:23:35+5:30
हायटेक कॉपीचा डाव उधळला

लिपिकाची परीक्षा द्यायला गेला अन् फसला; हायटेक कॉपीचा डाव उधळला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अवघ्या महिनाभरापूर्वी तलाठी ऑनलाइन परीक्षेत परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थी विद्यार्थ्यांना बाहेरून हायटेक पद्धतीने कॉपी पुरविणाऱ्या टोळीचा म्हसरूळ पोलिसांनी पर्दाफाश करत म्होरक्या गणेश गुसिंगेच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर कृषी विभागाच्या लिपिक पदाच्या परीक्षेतही असाच प्रकार उघडकीस आला असून हायटेक व स्मार्ट पद्धतीने कॉपी करत असताना म्हसरूळ पोलिसांनी एका युवकाचा डाव उधळून लावला.
येथील पुणे विद्यार्थिगृह केंद्रावर शासनाच्या कृषी विभागामार्फत वरिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात आली. जालना जिल्ह्यातील परीक्षार्थी संशयित सूरज विठ्ठलसिंग जारवाल या युवकाने मोबाइल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, सॅन्डो बनियन, तसेच सॅन्डल अशा हायटेक पद्धतीच्या कॉपीसाठी वापर केला होता. पोलिसांनी सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सुरक्षारक्षक तपासणी करत असताना संशयित जारवाल हा त्या ठिकाणाहून पळ काढू लागला. त्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे मोबाइल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, बनियन, पाकीट, तसेच एका सॅन्डलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू लपविलेल्या आढळून आल्या. तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जारवाल यास ताब्यात घेत वाहनांत डांबून पोलिस ठाण्यात नेले.