Happily forgot to sign the nomination form! | आनंदाच्या भरात उमेदवारी अर्जावर सही करायलाच विसरले !
आनंदाच्या भरात उमेदवारी अर्जावर सही करायलाच विसरले !

नाशिक : महापौर म्हणा अथवा उपमहापौर म्हणा मानाच्या या पदावर संधी मिळणे हे अनेकांना भाग्याचेच वाटते. महापालिकेत घडामोडी सुरू असताना त्याचा प्रत्यय आला. कोणी उमेदवारी दाखल करताना सहीच विसरून गेले तर कोणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर त्यांना चरण स्पर्श करू लागले. या सर्व भानगडीत अनेक संभाव्य फुटीर हे मात्र प्रकृती ठीक नसल्याच्या करणावरून मेडिकल लिव्हवर असल्याचे सांगितले जात होते.
महापौरपदाच्या निवडणुकीमुळे बुधवारी (दि.२०) महापालिकेचे राजीव गांधी भवन गजबजले होते. पक्षाच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच ताबा घेतला होता. पक्षाच्या वतीने कोणाला उमेदवारी दाखल करण्यास सांगितल्यानंतर गटनेते तसे स्पष्ट करीत आणि नंतर इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यास लगबग सुरू होत. भाजपच्या वतीने ज्येष्ठ नगरसेवक अरुण पवार यांना उपमहापौरपदासाठी संभाव्य उमेदवार घोषित केल्यानंतर ते अर्ज दाखल करण्यास पदाधिकाऱ्यांसमवेत आले. त्यांनी अर्जदेखील भरला. माध्यमांचे कॅमरे लकाकले आणि नंतर पुन्हा अर्ज तपासला तर त्यावर त्यांची सहीच नव्हती.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनीही त्यांना काय हे अर्ज दाखल करताना साधी सहीदेखील केली नाही का अशी विचारणा केली. त्यानंतर पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याचा रिटेक झाला आणि मग अर्ज दाखल झाले.
महापालिकेच्या या गर्दीत अनेक संभाव्य फुटीर हजर नव्हते. त्यांच्याबाबत विचारणा केल्यानंतर ते आजारी आहेत असे सांगितले जात त्यामुळे राजकीय आजार असलेले हे नगरसेवक मेडिकल लिव्हवर असल्याचे सांगितले जात. या गडबडीत महापौर मात्र खरोखरीच आजारी पडल्या. त्यांना एका खासगी इस्पितळात तपासणी आणि उपचारासाठी जावे लागल्याने त्या अनुपस्थित होत्या. भाजपकडील गैरहजर नेत्यांच्या यादीत दोन आमदार, माजी शहराध्यक्ष, प्रदेश चिटणीस असे अनेक जण नव्हते.
बोलावणे आल्याशिवाय नाही !
महापौरपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक आघाडीवर ज्यांचे नाव चर्चेत होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे नाराज होऊन ते महापालिकेत आले नाही. त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याला पक्षाने साधा अर्ज भरण्यासदेखील सांगितले नाही की, कोणी अन्य अर्ज दाखल करणाºयाने ज्येष्ठत्वाच्या नात्याने बोलावले नाही. मग कशासाठी यायचे असे सांगत बोलावणे आल्याशिवाय नाही या दिवाकरांच्या नाट्यछटेची आठवण करून दिली.
शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी एकत्र अर्ज दाखल केले. मात्र त्याचे छायाचित्र मात्र वेगवेगळे काढण्यात आले. तोच अर्ज दुसºया उमेदवाराच्या हातात देऊन छायाचित्रासाठी पोझ देण्यात येत होती.

Web Title:  Happily forgot to sign the nomination form!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.