हेल्मेट वापरणाऱ्या नाशिककरांना गुलाब अन् तुळस; न वापरणाऱ्यांना पाचशेचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:58 IST2019-05-13T14:56:48+5:302019-05-13T14:58:30+5:30
पोलिसांकडून हेल्मेट परिधान करून प्रवास करणा-या नाशिककरांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून ५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

हेल्मेट वापरणाऱ्या नाशिककरांना गुलाब अन् तुळस; न वापरणाऱ्यांना पाचशेचा भुर्दंड
नाशिक : शहर व परिसरात पोलीस आयुक्तांच्या आदेशान्वये सोमवारी (दि.१३) सकाळी नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत हेल्मेट-सीटबेल्ट सक्ती तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे नाशिककरांकडून स्वागत करण्यात आले. मोहिमेचे ‘पॉइंट’ सोशलमिडियावर पुर्वसंध्येला तसेच सकाळी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेत हेल्मेट परिधान करून उंबरा ओलांडणे पसंत केले. त्यामुळे पोलिसांकडून हेल्मेट परिधान करून प्रवास करणा-या नाशिककरांना स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गुलाबपुष्प, तुळसचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. ज्यांनी हेल्मेटकडे दुर्लक्ष केले त्यांच्याकडून ५०० रूपयांचा दंडही वसूल करण्यात आला.
शहरात वाढते दुचाकी अपघात आणि त्यामध्ये डोक्याला जबर मार लागून मृत्यूमुखी पडणा-यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हेल्मेट-सीटबेल्ट सक्तीची तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले. सर्व पोलीस ठाणे हद्दीतील २६ ते ३० पॉइंटवर संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक पोलीसांनी संयुक्तरित्या कारवाई केली.
काही दुचाकीस्वार महिला-पुरूष मोपेड दुचाकीच्या डिक्कीत हेल्मेट ठेवून दुचाकी चालवितानाही पोलिसांना आढळून आले. यावेळी अशा वाहनचालकांना अडवून पोलीसांनी प्रबोधन करत हेल्मेट घालण्यास भाग पाडले व दंड माफ क रून समज दिली. शहरात पोलिसांनी हेल्मेटविना प्रवास करणा-याविंरूध्द दंडात्मक कारवाईची विशेष मोहीम हाती घेतल्याने हेल्मेटखरेदीकडे नागरिकांची पावले वळल्याची दिसून आली.
महाविद्यालयीन युवक-युवतीपासून दुधवाल्यापर्यंत सर्वच नाशिककरांनी मोठ्या संख्येने हेल्मेट वापरण्यावर भर दिल्याचे दिसून आले. यामुळे शहरातील प्रत्येक सिग्नलवर महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक दुचाकीस्वार हेल्मेटमध्ये पहावयास मिळाले.