ग्रीन कॉरिडोर : नाशिकच्या मेंदूमृत युवकाच्या अवयवांमुळे थांबणार ‘त्यांची’ मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:56 PM2020-01-18T18:56:18+5:302020-01-18T19:00:07+5:30

रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात दाखल झालेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) हे एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते.

Green Corridor: Nashik's brains fight 'their' death due to dead organs | ग्रीन कॉरिडोर : नाशिकच्या मेंदूमृत युवकाच्या अवयवांमुळे थांबणार ‘त्यांची’ मृत्यूशी झुंज

ग्रीन कॉरिडोर : नाशिकच्या मेंदूमृत युवकाच्या अवयवांमुळे थांबणार ‘त्यांची’ मृत्यूशी झुंज

Next
ठळक मुद्देदोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयवदान‘ग्रीन कॉरिडोर’द्वारे अवयव बाणेर, पुणे येथील रूग्णालयांत

नाशिक : दिंडोरीरोडवर झालेल्या अपघातात डोक्यास जबर मार लागल्याने उपचारादरम्यान एका ३७ वर्षीय युवकाला डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. मेंदू मृत झाल्यानंतर जीवन संपुष्टात येते, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना पटवून देत अवयवदान चळवळीविषयी माहिती दिली. मुळचे नेपाळ येथील रहिवासी असलेल्या शर्मा कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने त्या युवकाच्या अवयांवमुळे चौघा गरजू रूग्णांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज थांबणार आहे. या युवकाचे अवयव शनिवारी (दि.१८) ‘ग्रीन कॉरिडोर’द्वारे बाणेर, पुणे येथील रूग्णालयांत पोहचविण्यात आले.
रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात दाखल झालेल्या शर्मा कुटुंबातील कर्ता पुरूष मिलन मोहन शर्मा (३७) हे एका हॉटेलमध्ये कारागिर म्हणून नोकरी करत होते. नोकरी आटोपून दिंडोरीरोडवरून दुचाकीने घरी परतत असताना शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात मिलन यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गंगापूररोडवरील ऋषिकेश रूग्णालयात त्यांना उपचारादरम्यान डॉक्टरांनी मेंदू मृत घोषित केले. डॉक्टर भाऊसाहेब मोरे, डॉ. संजय रकिबे यांनी अवयवदानाचे महत्त्व त्यांच्या पत्नी मीनल शर्मा व कुटुंबातील अन्य सदस्यांना पटवून दिले. यानंतर त्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तत्काळ याबाबत विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राला (झेडटीसीसी) रूग्णालयाकडून माहिती देण्यात आली. केंद्राकडून बाणेर येथील ज्यूपिटर व पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात गरजू रूग्ण असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार दोन मुत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत हे अवयव वरील रूग्णालयांमध्ये शनिवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास शहर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या ‘ग्रीन कॉरिडोर’मधून पोहचविण्यात आले. सुमारे तीन तासांत २२० किलोमीटर अंतर कापत रूग्णवाहिका (एम.एच.०४ जीपी २२२९) बाणेरला रूग्णालयात पोहचली.
असा होता ‘ग्रीन कॉरिडोर’
गंगापूररोडवरील मॅरेथॉन चौक, जुना गंगापूर नाका, कॅनडा कॉर्नर, वनविभाग सिग्नल, मायको सर्कल, चांडक सर्कल, गडकरी चौक सिग्नलवरून कालिकामंदीरमार्गे, मुंबईनाका व तेथून महामार्गाने वडाळानाका, द्वारका, काठेगल्ली, दत्तमंदीर, चेहडीमार्गे सिन्नर, नांदूरशिंगोटेपासून पुढे नाशिकफाट्यावरून बाणेर. शहर वाहतूक पोलिसांनी चिंचोळी फाट्यापर्यंत कॉरिडोरची धुरा सांभाळून पुढे ग्रामिण पोलिसांकडे जबाबदारी सोपविल्याचे उपनिरिक्षक सुजीत मुंढे यांनी सांगितले. वरील प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस नियुक्त करण्यात आले होते.
 

Web Title: Green Corridor: Nashik's brains fight 'their' death due to dead organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.