८ लाखांची उधारीची रक्कम वसूल करून गॅस एजन्सीचा कामगार फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:00 IST2020-07-02T17:59:48+5:302020-07-02T18:00:44+5:30
१ नोव्हेंबर २०१९ ते २० जून २०२० या कालावधीत संशयित पाटील याने विविध ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम वसूल करून ती एजन्सीच्या कार्यालयात जमा न करता परस्पर गायब करून पोबारा केला.

८ लाखांची उधारीची रक्कम वसूल करून गॅस एजन्सीचा कामगार फरार
नाशिक : येथील एका गॅस वितरकाच्या एजन्सीकडे सिलिंडर उधारीच्या रकमेची वसूली करणारा वसुली अधिकारी सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम विविध ग्राहकांकडून वसूल करून फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित फरार कर्मचाऱ्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्कर बापू पाटील (रा.संभाजी चौक, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण संपतराव मंडाले (रा.साधुवासवाणी रोड) यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. मंडाले यांची राणेनगर येथे भगवती गॅस एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून शहरातील सिडको, इंदिरानगर, जुनेनाशिक, बोधलेनगर, नाशिकरोड या उपनगरीय भागांमध्ये त्यांच्याकडून विविध ग्राहकांना घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर मागणीनुसार पुरविले जातात. तसेच शहरातील विविध स्वीटची दुकाने आणि मोठ्या हॉटेल्सचालकांनाही ते व्यावसायिक गॅस सिलिंडर उधारीत पुरवितात. या उधारीची रक्कम वसूल करण्याची जबाबदारी पाटीलकडे त्यांनी सोपविली होती.
१ नोव्हेंबर २०१९ ते २० जून २०२० या कालावधीत संशयित पाटील याने विविध ग्राहकांकडून वसूल केलेली सुमारे ७ लाख ९० हजार ५४७ रूपयांची रक्कम वसूल करून ती एजन्सीच्या कार्यालयात जमा न करता परस्पर गायब करून पोबारा केला. एका मिठाई दुकानदाराचा धनादेश पुन्हा आल्याने हा प्रकार उघडकीस आला. धनादेशाच्या मोबदल्यात ६५ हजार रूपये घेऊन संशयित पाटील याने नोकरीवर येणे परस्पर बंद केल्याने या सर्व फसवणूकीच्या प्रकार प्रकाशझोतात आला. मंडाले यांच्या फिर्यादीनुसार संशयित पाटीलविरूध्द तब्बल १३ ग्राहकांकडून सुमारे आठ लाख रूपयांची रोकडचा अपहार केल्याचे म्हटले आहे. यानुसार इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.