तलवारीचा धाक दाखवून लूटला चार लाखांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 01:48 IST2021-08-06T01:48:06+5:302021-08-06T01:48:29+5:30
पाथर्डी फाटा ते गरवारे पॉइंटरम्यान कारमॉल परिसरात एका ज्वेलर्सला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. ४) घडला आहे. लूटमार करणाऱ्यांनी व्यावसायिकाला दुचाकीवरून निर्जन स्थळी घेऊन जात तलवारीचा धाक दाखवून त्याच्याजवळील ९० हजाराची रोकड व दागिने लुटून नेले तसेच दुकानाची चावी हिसकावून दुकानातून ७२.५ ग्रॅम वजनाचे दागिने लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

तलवारीचा धाक दाखवून लूटला चार लाखांचा ऐवज
इंदिरानगर : पाथर्डी फाटा ते गरवारे पॉइंटरम्यान कारमॉल परिसरात एका ज्वेलर्सला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. ४) घडला आहे. लूटमार करणाऱ्यांनी व्यावसायिकाला दुचाकीवरून निर्जन स्थळी घेऊन जात तलवारीचा धाक दाखवून त्याच्याजवळील ९० हजाराची रोकड व दागिने लुटून नेले तसेच दुकानाची चावी हिसकावून दुकानातून ७२.५ ग्रॅम वजनाचे दागिने लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय साधन बेरा (४३, रा गणेशवाडी) अंबड येथील दुकानातून मोटारसायकलने जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या तिघांनी त्यांना कारमॉल परिसरात अडवले. तिघांपैकी एकजण त्यांच्या दुचाकीवर बसला. त्याने बेरा यांना पाठीमागून धारदार शस्त्र लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत स्वराज्यनगर परिसरातील जंगल झाडीत नेले. त्याठिकाणी तिघांनीही त्यांना तलवारीच्या मागील बाजूने मारहाण करीत जखमी केले. तसेच त्यांच्याकडील ९० हजार रुपयांच्या रोख रकमेसह ३२ ग्रॅम वजनाचे दागिने लुटले. त्यानंतर दोन लुटारूंनी बेरा यांना त्याच ठिकाणी बसवून ठेवले, तर तिसऱ्या लुटारूने बेरा यांच्याकडून त्यांच्या दुकानाच्या चाव्या हिसकावून घेत त्यांच्या दुकानातून ७२.५ ग्राम वजनाचे दागिने लुटले. लुटलेल्या दागिन्यांसह पुन्हा झाडीत येऊन बेरा यांना पोलिसात तक्रार दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देत तिघेही लुटारू निघून गेले. त्यानंतर बेरा यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून घडलेल्या प्रकाराची पोलिसांना माहिती देत अज्ञातांविरोधाच मारहाण करून लुटल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस याप्रकरणातील लुटारूंचा शोध घेत आहेत.