निवडणुकीमुळे चार दिवस मद्यविक्री बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:17 IST2018-06-21T00:17:51+5:302018-06-21T00:17:51+5:30
विधान परिषदेच्या शिक्षक आमदार मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पुढील आठवड्यात चार दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे़ तळीराम अगोदरच मद्यसाठा करून ठेवतात, मात्र मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा आढळून आल्यास उत्पादन शुल्क कारवाई करण्याची शक्यता आहे़

निवडणुकीमुळे चार दिवस मद्यविक्री बंद
नाशिक : विधान परिषदेच्या शिक्षक आमदार मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पुढील आठवड्यात चार दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे़ तळीराम अगोदरच मद्यसाठा करून ठेवतात, मात्र मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा आढळून आल्यास उत्पादन शुल्क कारवाई करण्याची शक्यता आहे़ राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २५ जून रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. या मतदानाच्या ४८ तास अगोदर म्हणजेच २३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपासून सर्व प्रकारचे परवानाधारक बिअरबार, मद्यविक्रेते, ताडी आणि निरा विक्री केंद्र बंद राहणार आहेत. २४ जून रोजी संपूर्ण दिवसभर आणि २५ जून रोजी मतदानाची वेळ संपेपर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यामुळे मतदानानंतर कार्यकर्त्यांची श्रमपरिहाराची सोय होऊ शकते़ मात्र अगोदरचे दोन दिवस तळीरामांना मद्याविना काढावे लागणार आहेत. मतदानानंतर दोन दिवस मोकळीक असली, तरी २८ जून रोजी मतमोजणी होणार असून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारची मद्यविक्री केंद्रे बंद राहणार आहेत. त्यामुळे मद्यपींना एकाच आठवड्यात चार दिवस किंवा किमान दोन दिवस तरी मद्य मिळणार नाही़ मद्यविक्री दुकाने बंदच्या पार्श्वभूमीवर काही जण मद्याचा साठा करून ठेवतात़ मात्र मद्यसाठा मोठ्या प्रमाणात आढळून आल्यास त्यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग छापे टाकणार आहेत.