माजी मंत्री बबनराव घोलप नाराज प्रकरण; माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
By संजय पाठक | Updated: September 17, 2023 19:32 IST2023-09-17T19:32:32+5:302023-09-17T19:32:40+5:30
मतदारसंघात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी मंत्री बबनराव घोलप नाराज प्रकरण; माजी आमदार योगेश घोलप यांनी घेतली शरद पवारांची भेट
नाशिक- शिवसेना ठाकरे गटाचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप हे शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराज असतानाच त्यांचे पुत्र आणि देवळाली मतदार संघाचे माजी आमदार योगेश घोलप यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे या मतदारसंघात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.
आपण शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली असल्याचा दावा योगेश घोलप यांनी केला असला तरी घोलप यांच्या नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटातून प्रतिसाद मिळत नसल्याने हा दबाव तंत्राचा भाग असल्याची चर्चा आहे. देवळाली मतदारसंघातून बबनराव घोलप 25 वर्ष सलग आमदार राहिलेले आहेत त्यानंतर त्यांचे चिरंजीव योगेश घोलप यांनी देखील एकदा यश मिळवले आहे.
दरम्यान, बबनराव घोलप शिर्डी लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असून त्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली होती मात्र पक्षातून बाहेर पडलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात आला तसेच बबनराव घोलप यांच्याकडील संपर्क मंत्रीपद काढून घेण्यात आले. त्यामुळे बबनराव घोलप यांनी गेल्या आठवड्यात उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, आठ दिवस उलटले तरी या संदर्भात ठाकरे गटाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही, त्यामुळे आता वेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा आहे.