Forced recovery of license fee | परवानाशुल्काची सक्तीने वसुली

परवानाशुल्काची सक्तीने वसुली

नाशिक : कोरोनामुळे गेली दीड महिन्यांहून अधिक कालावधीनंतर दुकान उघडलेल्या मद्यविक्रेत्यांनी आता ग्राहकांची मागणी व गरज ओळखून त्यांची विविध मार्गाने अडवणूक करण्यास सुरुवात केली असून, एरव्ही येईल त्याच्या हातात मद्याची बाटली सोपविणारे विक्रेते आता ग्राहकाला मद्याच्या किमतीबरोबरच ते प्राशन व बाळगण्यासाठीच्या परवान्यासाठी आग्रह धरून वसुली करू लागले आहेत. विशेष म्हणजे काही ठराविक दुकानदारच या कामी आग्रही असून, काही दुकानदारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने परवाना शुल्काच्या वसुलीबाबत शासनाची संमती आहे की, दुकानदार स्वत:च याबाबत आग्रही आहेत त्याचा खुलासा मात्र होऊ शकलेला नाही.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २३ मार्चपासून शासनाने सर्व प्रकारच्या मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश काढले होते. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आली असली, या काळात तळीरामांच्या जिवाची घालमेलही कोरोनापेक्षा अधिक होती. मात्र शासनाने टप्पाटप्याने संचारबंदी व लॉकडाउन उठविण्यास सुरुवात केल्याने गेल्या आठवड्यापासून मद्यविक्रीही विशिष्ट कालावधीसाठी खुली केली आहे. सुरुवातीच्या दोन दिवस मद्यदुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या, या दुकानदारांनी शासनाने दिलेल्या सूचनांनुसार ग्राहकांची गर्दी टाळण्याच्या उपाययोजना केल्या असून, त्यानुसार दुकानदार त्याची अंमलबजावणी करीत असले तरी, ग्राहकांची गरज व मागणी लक्षात घेऊन काही दुकानदारांनी प्रत्येक ग्राहकाला मद्यप्राशन व बाळगण्याचा शासन परवाना सक्तीचा केला आहे. एखाद्या ग्राहकाकडे मोजकेच पैसे असतील तर त्याला परवानाअभावी मद्य देण्यास मज्जाव केला जात आहे. अर्थात काही विशिष्ट दुकानदारांनी अशी भूमिका घेतली असली तरी, काही दुकानदार मात्र परवान्याशिवायही मद्यविक्री करीत आहेत. त्यामुळे एका दुकानावर एक व दुसऱ्याला दुसरा न्याय कसा? असा प्रश्न विचारला जात आहे. प्रत्येक मद्यविक्रीला जर परवाना सक्तीचा असेल तर इतर दुकानदार परवाना न देताही मद्याची विक्री कशी करीत आहेत? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

Web Title:  Forced recovery of license fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.