मुंबई-आग्रा महामार्गावरील हिरे महाविद्यालयासमोर असलेल्या ‘गोदावरी चेंबर’या व्यापारी संकुलाच्या तळमजल्यात खुश डेन्ट-डेन्टल सिस्टीम नावाच्या दुकानाला अचानकपणे आग लागली. या दुकानातून दाताच्या दवाखान्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य विक्री केले जाते. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पंचवटी उपकेंद्राच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग विझविण्यास सुरुवात केली. अतिरिक्त मदत म्हणून कोणार्कनगर विभागीय कार्यालयातूनसुध्दा मेगा बाऊजर बंबासह जवानांनी दाखल होत मदतकार्यात सहभाग घेतला. लीडिंग फायरमन विलास डांगळे, संतोष मेंद्रे, उमेश दाते, प्रदीप बोरसे, संदीप जाधव, महेंद्र सोनवणे, बंबचालक मुश्ताक पाटकरी यांनी शर्थीचे प्रयत्न करत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. दुकानाच्या वरच्या बाजूस माळ्यावर असलेल्या विविध जुन्या बिलांच्या कागदांचा मोठा गठ्ठा व रद्दीमुळे आगीने अधिक भडका घेतल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
--
फोटो आर वर ११फायर नावाने सेव्ह आहे.