धक्कादायक : ओल्या पार्टीत डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 21:58 IST2021-01-05T21:58:08+5:302021-01-05T21:58:45+5:30

माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले.

Finished the friend by throwing a stone at the head at the wet party | धक्कादायक : ओल्या पार्टीत डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले

धक्कादायक : ओल्या पार्टीत डोक्यात दगड टाकून मित्राला संपविले

ठळक मुद्देआनंदवली शिवारात घडली घटना

नाशिक : आनंदवली शिवारातील वापरात नसलेल्या एका निर्जन इमारतीत एकत्र येत दोघा मित्रांनी ओली पार्टी केली. यावेळी दोघांमध्ये जुन्या काही कारणांवरुन भांडण झाले. यावेळी एकाने मोठा दगड उचलून दुसऱ्याच्या डोक्यात टाकून ठार मारल्याची घटना मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास घडली. यानंतर मद्यपी संशयिताने खूनाची कबुली देत स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूररोडवरील एका वाइन शॉपमधून मंगळवारी संशयित आरोपी रुपेश छोटुलाल यादव (३६,रा.शिवशक्ती चौक, सिडको) याने त्याचा मित्र महेश विष्णू लायरे (२९,रा. दत्तनगर, चुंचाळे) याच्यासोबत मद्य खरेदी केले. यानंतर पार्टी कोठे करायची? यावर खल करत आनंदवली शिवारातील गंगापूररोडलगत वापरात नसलेल्या निर्जन इमारतीत दोघेही जाऊन बसले. तेथे दोघा मित्रांनी सोबत मद्य रिचविले. मद्याची नशा झिंगल्यानंतर दोघांनी एकमेकांची कुरापत काढून भांडण केले. या भांडणाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी संशयित रुपेश याने मनात राग धरुन त्याच्यासोबत बसलेल्या महेशच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले.

यानंतर रुपेशने इमारतीतून बाहेर पडत तेथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका नागरिकाला स्वत:केलेल्या गुन्ह्याबाबत सांगितले. त्या नागरिकाने त्यास धरुन ठेवत तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित संशयित रुपेश यास पोलीस वाहनात डांबले. तसेच इमारतीत अंधारात पडलेला मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी संशयिताविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Finished the friend by throwing a stone at the head at the wet party