लासलगाव : पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, याकरिता पोलीस, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता फिरणाऱ्या, तसेच विनाकारण फिरून सोशल डिस्टन्सिंगचा भंग करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची जोरदार मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. जानेवारी २०२१पासून ते आजपर्यंत पोलीस ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०० नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यात २ लाख १ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पुढे सुरूच राहणार असल्याची माहिती सपोनि राहुल वाघ यांनी दिली. अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तू तसेच मेडिकल व इतर कारणांमुळे रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशाची सपोनि राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि आदिनाथ कोठळे, पोलीस कर्मचारी कैलास महाजन, प्रदीप अजगे, नंदकुमार देवढे व योगेश जामदार काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यांकडून दोन लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:14 IST