...अखेर संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:41+5:302021-02-05T05:45:41+5:30
नाशिक : प्रत्येक साहित्य संमेलनाचे एक वैशिष्ट्यपूर्ण बोधचिन्ह असण्याची परंपरा असल्याने नाशिकच्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याबाबतदेखील सर्वांनाच उत्सुकता ...

...अखेर संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण !
नाशिक : प्रत्येक साहित्य संमेलनाचे एक वैशिष्ट्यपूर्ण बोधचिन्ह असण्याची परंपरा असल्याने नाशिकच्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याबाबतदेखील सर्वांनाच उत्सुकता होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३०) संमेलनाच्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. राज्यभरातील चित्रकार आणि आयडीएशन तज्ज्ञांनी पाठविलेल्या ५६ बोधचिन्हांमधून कोल्हापूरच्या अनंत खासबारदार यांनी केलेल्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली आहे.
प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथमदर्शनी त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याने होते. नाशिकला होत असलेल्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचेही बोधचिन्ह आणि घोषवाक्य आकर्षक आणि समर्पक असावे, यासाठी एका खुल्या स्पर्धेचे आयोजन करून बोधचिन्ह तयार करून पाठविण्याचे आवाहन आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. बोधचिन्हाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेस राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. ५६ जणांनी बोधचिन्ह आणि घोषवाक्य बनवून पाठविले होते. त्यातूनच खासबारदार यांनी बनविलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे.
शनिवारी या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे प्रकाशन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी म.वि.प्र.चे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ. जयंत पवार, जयप्रकाश जातेगावकर, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, चंद्रकांत दीक्षित, मुक्ता बालिगा, किरण सोनार, डॉ.एस.के.शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुकुंद कुलकर्णी यांनी केले. बोधचिन्हाचे विश्लेषण परीक्षक दत्ता पाटील यांनी केले. या निवड समितीत वास्तू विशारद संजय पाटील, चित्रकार राजेश सावंत, कल्पक योजनाकार आनंद ढाकीफळे, लेखक दत्ता पाटील, लेखक प्राजक्त देशमुख यांनी काम पाहिले.
इन्फो
अनंत अमुची ध्येयासक्ती
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कोलंबसाच्या गर्वगीतातील ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ या शब्दांनी नटलेल्या घोषवाक्याने बोधचिन्हाला खऱ्या अर्थाने नाशिकचा स्पर्श लाभला आहे. लेखणीच्या वरील भागातील या घोषवाक्याने बोधचिन्हाला खरी झळाळी लाभली आहे.
इन्फो
अनोखा योगायोग
यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे जन्मगाव कोल्हापूर असल्याने त्यांच्या जन्मापासूनच कोल्हापूरशी ऋणानुबंध जुळलेला आहे. त्याच कोल्हापूर नगरीतील खासबारदार यांनी केलेल्या या कल्पक बोधचिन्हाला निवडण्यात आले आहे.
इन्फो
स्वच्छ भारत अभियानच्या बोधचिन्हाचीही निर्मिती
चित्रकार खासबारदार हे निर्मिती संस्थेमध्ये क्रिएटीव्ह आर्ट डायरेक्टर म्हणून २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी तयार केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठीच्या गांधीजींच्या चष्म्याच्या बोधचिन्हाची निवड झाल्याने त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते.
फोटो
३०बोधचिन्ह