... finally print that ‘hookah parlor’ | ...अखेर ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा

...अखेर ‘त्या’ हुक्का पार्लरवर छापा

नाशिक : साईनाथनगर येथे मागील अनेक महिन्यांपासून एका कॅफेमध्ये सर्रासपणे तंबाखुजन्य अमली पदार्थाचा वापर करत हुक्क्याचा धूर हवेत सोडला जात होता. याबाबत परिसरातील नागरिकांकडून तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या; मात्र दोन पोलीस ठाण्यांच्या ‘सीमा’ असल्यामुळे या पार्लरवर कारवाई केली जात नव्हती. अखेर मुंबईनाका पोलिसांनी रविवारी (दि.२) धाडस दाखवून छापा टाकला.
मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी रात्री साईनाथनगर येथील ‘अजिज मेन्शन कॅफे’वर छापा टाकला. कोरोनाचे संक्रमण सुरू असतानासुद्धा सदर ठिकाणी व्यवसाय चालविला जात असल्याचे कारवाईदरम्यान पोलिसांना आढळून आले.
संशयित अल्ताफ इस्माईल सय्यद, शाहीद दस्तगीर खान यांच्यासह इतर १८ ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी हुक्कासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. सहायक आयुक्त मंगलसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण रौंदळे, उपनिरीक्षक श्रीवंत यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: ... finally print that ‘hookah parlor’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.