भरधाव ओम्नी कारच्या धडकेत अॅक्टिवाचालक तरुणाचा नाशकात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 15:54 IST2018-01-11T15:54:15+5:302018-01-11T15:54:44+5:30

भरधाव ओम्नी कारच्या धडकेत अॅक्टिवाचालक तरुणाचा नाशकात मृत्यू
नाशिक : वडनेर-पाथर्डी रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणा-या मारुती ओम्नी वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत समोरून मार्गस्थ होणा-या दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओम्नीचालकाविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित ओम्नीचालक एकलव्य मोतीराम कोल्हे (३०) यांनी त्यांची मोटार (एमएच १५ एएच ३५२१) भरधाव वेगाने पाथर्डी फाट्याच्या दिशेने चालवत समोरून पाथर्डी गावाच्या दिशेने जाणारी अॅक्टिवा दुचाकीला (एमएच१५ ईडब्ल्यू २०२३) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तरुण मयूर दत्तात्रय कणसे (२७,रा. म्हाडा कॉलनी, पाथर्डी) यास डोक्याला गंभीर मार लागला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. तसेच वाहनांचे गंभीर नुकसान झाले. याप्रकरणी कोल्हेविरुद्ध मयत मयूरचे वडील दत्तात्रय कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.