कष्टाने पिकविलेली कोथिंबीर दोन रुपयांत विकायची कशी?; वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:36 IST2024-12-26T06:36:23+5:302024-12-26T06:36:35+5:30
मेथीमध्ये सोडली जनावरं; संतापाला मोकळी करून दिली वाट

कष्टाने पिकविलेली कोथिंबीर दोन रुपयांत विकायची कशी?; वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर
नाशिक : पिकाला कवडीमोल भाव मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने येवला तालुक्यातील राजापूर परिसरातील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या पिकावर नांगर फिरवला तर दुसऱ्या शेतकऱ्याने मेथीच्या पिकामध्ये जनावरे सोडून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, नाशकात बुधवारी (दि. २५) किरकोळ बाजारात मेथीला १० ते १५ रुपये जुडी तर कोथिंबिरीला २ ते १५ रुपये जुडी असा दर मिळाल्याने बळीराजा संतप्त झाला आहे.
शेतकरी राजेंद्र देवराम वाघ यांनी कोथिंबीर लागवड केली होती. ती काढणीस आली व बाजारात कवडीमोल भावाने विक्री झाली. यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. वाघ यांनी मनमाड बाजार समितीत कोथिंबीर विक्रीसाठी नेली असता, तेथे त्यांना कमी दर मिळाला. त्यामुळे त्यांनी कोथिंबिरीच्या शेतात नांगर फिरवला. खर्चाचा मेळ बसत नसल्याने त्यांनी पीकच नष्ट केले आहे.
शेतकरी सुदाम पुंडलिक वाघ यांनी मेथीची लागवड केली होती. मात्र, मेथीला खूपच कमी दर मिळत असल्याने त्यांनी मेथीच्या पिकात जनावरे सोडली आहेत. नफा मिळत नसल्याने निराश राजेंद्र वाघ व सुदाम वाघ यांनी पीकच नष्ट केले आहे.
मी मेथी लागवड केली होती. ती काढली व बाजारभाव कमी झाले. कांदा, भाजीपाला याचेही बाजारभाव उतरले असल्याने केलेला खर्चही वसूल होत नाही. - सुदाम वाघ, शेतकरी, येवला
शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिल आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असला तरी त्याला आपला उदरनिर्वाह करताना अनेक अडचणी येतात. - राजेंद्र वाघ, शेतकरी, राजापूर, ता. येवला