निर्यातबंदी उठली अन् परदेशातील दर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 00:24 IST2020-12-30T22:42:07+5:302020-12-31T00:24:31+5:30
नाशिक : भारताने कांद्याची निर्यात खुली केली अन् परदेशातील कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे निर्यातबंदी उठल्याने खूप हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. कांद्याच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. फार फार तर ३०० ते ४०० रुपयांनी दर वाढतील, असा तज्ज्ञांना अंदाज आहे.

निर्यातबंदी उठली अन् परदेशातील दर कोसळले
नाशिक : भारताने कांद्याची निर्यात खुली केली अन् परदेशातील कांद्याचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे निर्यातबंदी उठल्याने खूप हुरळून जाण्यासारखी स्थिती नाही. कांद्याच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. फार फार तर ३०० ते ४०० रुपयांनी दर वाढतील, असा तज्ज्ञांना अंदाज आहे.
शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणल्यास, त्यांना वाढीव किमतीचा फायदा होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविल्याने स्थानिक बाजारांमध्ये मंगळवारपासून कांदाभावात थोडी-फार सुधारणा होऊन भाव वाढले आहेत. मात्र, ते आणखी वाढतील की नाही, याची खात्री देता येत नाही. कारण भारताची निर्यात खुली झाल्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराणमधील कांद्याचे दर कमी झाले आहेत, शिवाय तेथे कांदा पुरेसा उपलब्ध आहे.
आपल्याकडील कांद्याला त्या जागतिक बाजारपेठेत दराबाबत स्पर्धा करावी लागणार असल्याने, व्यापारी चढ्या दराने कांदा खरेदी करण्याचा धाका पत्करणार नाहीत. यामुळे कांदा दर २,५०० ते ३,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर राहू शकतात, असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे.
आयातीचे धोरण कायम
निर्यातबंदी उठवितानाच केंद्र शासनाने कांदा आयातीला मुदत वाढ दिलेली आहे. देशात लागवड झालेल्या लाल कांद्याच्या उत्पादनाचा अंदाज नसल्याने जर किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले, तर निर्यातबंदी होऊ शकते, असा यापूर्वीचा अनुभव पाहता, शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊनच कांदा विक्रीचा निर्णय घ्यायला हवा, असा सल्लाही दिला जात आहे.
निर्यातबंदी उठल्यामुळे इतर देशांमधील कांदाभाव पडले आहेत. यामुळे आपल्याकडील कांदा दरात खूप मोठा फरक पडेल, असे वाटत नाही. खूप झाले, तर २०० ते ३०० रुपयांनी कांदा भाव सुधारतील. आपल्याकडील कांद्याला परदेशात स्पर्धा करावी लागणार आहे. निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे देशात कोसळत असलेले कांदाभाव स्थिर राहाण्यास मदत झाली आहे.
- नितीन जैन, कांदा निर्यातदार, लासलगाव