धक्कादायक! जीवे मारण्याची धमकी देत २० लाख हडपले; माजी नगरसेवकासह तिघांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 17:23 IST2025-10-23T17:15:18+5:302025-10-23T17:23:23+5:30
नाशिक पोलिसांनी सध्या राजकीय आणि सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे

धक्कादायक! जीवे मारण्याची धमकी देत २० लाख हडपले; माजी नगरसेवकासह तिघांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा
Nashik Crime:नाशिक शहरात गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' या विशेष मोहिमेमुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता खंडणीखोरांविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस नागरिक करू लागले आहेत. याच मोहिमेमुळे धीर आलेल्या एका ७१ वर्षीय वृद्धाने माजी नगरसेवक पवन पवार आणि त्याच्या साथीदारांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या खंडणी आणि अपहरणाच्या गंभीर कृत्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
माजी नगरसेवक पवन पवार, त्याचा भाऊ विशाल पवार आणि कल्पेश किर्ते यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खंडणी, जीवे ठार मारण्याची धमकी आणि खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी ही तक्रार नोंदवून घेतली आहे.
नेमका प्रकार काय घडला?
नवीन सिडको भागात राहणाऱ्या ७१ वर्षीय फिर्यादी वृद्धाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २०२३ मध्ये संशयित आरोपी पवन पवार आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या घरी जाऊन धमकावले. आरोपींनी वृद्धाला चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर काळ्या काचा असलेल्या मोटारीत बळजबरीने डांबून त्यांना अंबड येथील एका बँकेच्या शाखेत नेले. बँकेत जबरदस्ती करत वृद्धाच्या खात्यातून २० लाख रुपये काढण्यास भाग पाडले आणि ती संपूर्ण रक्कम पवार बंधूंनी हडप केली. एवढेच नव्हे, तर आरोपींनी वृद्धाच्या मालमत्तेशी संबंधित नोटरी आणि बळजबरीने स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
पोलिसांच्या मोहिमेमुळे मिळाला धीर
पोलिसांनी अलीकडेच नाशिकमध्ये गुंडगिरी आणि खंडणीखोरांविरुद्ध 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' ही मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत पवन पवारविरुद्ध गुन्हे दाखल करून त्याच्या घरावर छापाही टाकण्यात आला होता. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आणि कायद्याच्या धाकामुळे ७१ वर्षीय आजोबांनी अंबड पोलीस ठाण्यात येऊन आपल्यासोबत दोन वर्षांपूर्वी घडलेला हा गंभीर प्रकार सांगितला.