जुलै मध्येही जिल्ह्यातील ५८ गावे तहानलेलीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST2021-07-07T04:17:42+5:302021-07-07T04:17:42+5:30
नाशिक: मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक भागांत सुरू झालेल्या टँकर्सच्या संख्येत घट झाली असली तरी काही गावांना अजूनही ...

जुलै मध्येही जिल्ह्यातील ५८ गावे तहानलेलीच
नाशिक: मे महिन्यात जिल्ह्यातील अनेक भागांत सुरू झालेल्या टँकर्सच्या संख्येत घट झाली असली तरी काही गावांना अजूनही टॅकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्यामुळे सहा तालुक्यांमधील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत असल्याने सद्य:स्थितीत जिल्ह्यात ५८ गावांना २७ टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने यंदा पाण्याची टंचाई जाणवणार नाही अशी एकूणच स्थिती होती. परंतु मे महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातून टँकर्सची मागणी होऊ लागली आणि जूनच्या प्रारंभी जिल्ह्यात ५६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. यामध्ये येवला तालुक्यात सर्वाधिक टँकर्स सुरू करण्यात आले होते. जून महिन्यातील या परिस्थितीत जुलैमध्येही फारसा फरक पडलेला नाही. टँकर्सची संख्या कमी झालेली असली तरी येवल्यातील गावांना जाणवणारी पाणीटंचाई कायम आहे. जूनच्या प्रारंभी जिल्ह्यात ५६ टँकर सुरू होते. जूनअखेरपर्यंत त्यात १६ने घट झाली.
जुलैच्या सुरुवातील जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यामुळे टँकर्सची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्याने तहानलेल्या गावांना फारसा दिलासा मिळाला नाही. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ३६ गावे आणि २२ वाड्यांना २७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये सात शासकीय, तर २० खासगी टँकर्सचा वापर केला जात आहे.
बागलाण तालुक्यातील ९, चांदवड-१०, देवळा ३, मालेगाव ७, नांदगाव १, येवला २८ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गावांना पाणीुपरवठा करण्यासाठी १० विहिरी अधिगृहित करण्यात आलेल्या आहेत, तर ४६ खासगी विहिरींच्या माध्यमातून गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुलै महिना सुरू होऊनही तहानलेल्या तालुक्यांना दिलासा मिळालेला नाही. जुनच्या तुलनेत टँकर्सची संख्या कमी झालेली असली तरी आता पावसाने दडी मारल्यामुळे टँकर्सची मागणी वाढण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणश, आणि त्र्यंबक तालुक्यातून टँकर्सची मागणी झालेली नसल्याने या भागात टँकर्स सुरू करण्यात आलेले नाही. याशिवाय अधूनमधून या तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी येत असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. जूनच्या सुरुवातीला झालेला पावसाचादेखील दिलासा या तालुक्यांना मिळालेला आहे.
--इन्फो--
येवल्यात सर्वाधिक टॅंकर्स
येवला तालुक्यात १५ गावे, १३ वाड्या अशा एकूण २८ ठिकाणी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे येवला तालुक्यात मागील महिन्यांपासून टँकर्स सुरूच आहे. संख्या काहीशी कमी झालेली असली तरी तालुक्याला दिलासा मिळालेला नाही. नऊ तालुके हे टँकरमुक्त आहेत.