Even if it is unlocked, it is necessary to try to get rid of fear! | अनलॉक झाले असले तरी भयमुक्तीचे प्रयत्न होणे गरजेचे!

अनलॉक झाले असले तरी भयमुक्तीचे प्रयत्न होणे गरजेचे!

ठळक मुद्देकोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच; कुठे व काय चुकते आहे याचा शोध घेणे अपेक्षितकाही अटी-शर्तींवर दुकाने सुरू करायला परवानगी मिळाली आहे महापालिकेच्याच यंत्रणेबाबत प्रशासनाला विश्वास नसल्याचे यातून स्पष्ट व्हावे.मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष..

सारांश

भय बाजूस सारून जनजीवन पूर्वपदावर येत असले तरी, कोरोनाबाधित व बळींची संख्या कमी व्हायचे नाव घेत नसल्याने समाजमनातील चिंता टिकून आहे. बाकी सर्व कामे बाजूस सारून शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे, प्रशासन व विशेषत: डॉक्टरांची अविरत धडपड सुरू आहे; तरी हे संकट आटोक्यात येताना दिसत नाही त्यामुळे नेमके कुठे व कुणाचे चुकते आहे याचा गांभीर्याने शोध घेतला जाणे गरजेचे बनले आहे.

शहरातले चलनवलन पूर्ववत सुरू झाले असले तरी कोरोनाची दहशत संपताना दिसत नाही. खरे तर भय असलेच पाहिजे, कारण त्यामुळे तरी मनुष्य सावधानतेने वागतो व वावरतो. पण हे भय फार काळ टिकून राहणार असेल तर त्याचा समाजाच्या विविध घटकांवर जो परिणाम होतो तो आणखीनच नवीन समस्यांना जन्म घालणारा ठरू शकतो, त्यामुळे भयमुक्ती गरजेची आहे; पण त्याउलट भयात भर पडताना दिसत आहे. नाशिक शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, बळींची संख्या साडेतीनशेच्या जवळपास पोहोचली आहे. ६१ प्रभागांच्या नाशिक शहरात कोरोनामुळे ७५०पेक्षा जास्त प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे लागले आहेत. एकेका दिवसात २० ते २२ जण मृत्युमुखी पडू लागल्याने अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे त्यामुळे चिंता वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे. कोरोनासोबतच यापुढे जगणे निश्चित असले तरी, त्याचे भय दूर होत नसल्याने एकूणच व्यवहार, व्यापार-उद्योगांवर व समाजजीवनावर त्याचे परिणाम होताना दिसू लागले आहेत, खरी धोक्याची बाब आहे ती हीच.

वाहतूक व्यवस्थावगळता बाकी व्यवहार अनलॉक झाले असले तरी भय कायम असल्यामुळे ग्राहक दुकानांकडे फिरकेनासा झाला आहे. अगदी भाजीपाला घेतानादेखील ग्राहक विचार करू लागला आहे. म्हणजे दुकानातील मालही आहे पडून व भाजीपालाही जातो आहे सडून, अशी ही अवस्था आहे. व्यावसायिक कोणीही असो, लहान की मोठा; प्रत्येकजण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे. उत्पन्न शून्यावर आले आहे व बँकांचे व्याजाचे मीटर मात्र फिरते आहे. अर्थात काही अटी-शर्तींवर दुकाने सुरू करायला परवानगी मिळाली आहे खरी; पण दुकानात ग्राहकच यायला तयार नाहीत म्हटल्यावर सर्वच व्यापारीवर्गाची स्थिती बिकट बनली आहे.

चाचण्या वाढविल्यामुळे प्राथमिक अवस्थेतच निदान होऊन उपचाराअंती घरी गेलेल्यांचे प्रमाण वाढत आहे, ही बाबही दिलासादायकच आहे. तथापि मध्यंतरी गाजावाजा झालेले काही कोविड केअर सेंटर्स किंवा व्यवस्था अद्याप का सुरू होऊ शकल्या नाहीत याचाही विचार व्हायला हवा. कारण तसे होऊ न शकल्याने अधिकतर बाधितांना घरीच कॉरण्टाइन राहण्याचे सल्ले दिले जात आहेत. दाट वस्तीत आढळणारे बाधितही घरीच कॉरण्टाइन केले जाणार असतील तर कसे यायचे संकट आटोक्यात, हा यातील प्रश्न आहे. बाधितांचे विलगीकरण नीटसे किंवा प्रभावीपणे होत नसल्यानेच की काय, एकेका सोसायटीमध्ये वीस ते पंचवीस बाधित आढळू लागले आहेत. तेव्हा याबाबत खरेच कुठे चुकते आहे याचा विचार केला जाणे गरजेचे आहे.

ज्यादा बिलिंगच्या तक्रारीमुळे खासगी रुग्णालयांना वेळोवेळी धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर कारवाईचे बडगे उगारण्याची भाषा केली जाते परंतु सरकारी व्यवस्था धड नसेल तर बाधितांना खासगीकडे जाण्याशिवाय पर्याय उरतो तरी कुठे? याचा विचारही केला जावयास हवा. घंटागाड्यां-प्रमाणेच रुग्णवाहिका व शववाहिकांनाही जीपीएस यंत्रणा बसवावी लागत असेल तर महापालिकेच्याच यंत्रणेबाबत प्रशासनाला विश्वास नसल्याचे यातून स्पष्ट व्हावे. अशा स्थितीत खासगी रुग्णालयांवर डोळे वटारून काय उपयोग होणार? तेव्हा गरज आहे ती उणिवा शोधून त्या तातडीने दुरुस्त करण्याची.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे नाशिककरांचे लक्ष..
नाशकातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले होते; परंतु या दौºयाला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडायला हवे, असा सल्ला शरद पवार यांनी दिल्यानंतर ठाकरे पुणे येथे जाऊन आले; परंतु नाशिककर अद्यापही प्रतीक्षेत आहेत. आता तर मुंबईत पावसाने प्रचंड नुकसान घडविल्याने ठाकरे तेथे अडकून पडणे स्वाभाविक आहे, त्यामुळे मुख्यमंत्री कधी नाशिकला येतील व येथील परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने निर्णय घेतील याची आस शहरवासीयांना लागून आहे.

Web Title: Even if it is unlocked, it is necessary to try to get rid of fear!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.