बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:17 PM2020-06-15T23:17:35+5:302020-06-16T00:20:23+5:30

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूरजवळील दोनवाडे येथील रहिवासी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्या सुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापूर्वी घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात याच गावात प्राण गमवावे लागले होते.

Elderly man killed in leopard attack | बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध ठार

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध ठार

Next

देवळाली कॅम्प : नाशिक तालुक्यातील भगूरजवळील दोनवाडे येथील रहिवासी जीवराम गोविंद ठुबे (७६) यांच्यावर बिबट्याने झापामध्ये शिरून पहाटेच्या सुमारास साखरझोपेतच हल्ला चढविल्याची घटना सोमवारी (दि.१५) उघडकीस आली. सव्वा महिन्यापूर्वी घराच्या ओट्यावर खेळत असलेल्या एका चिमुकल्याला बिबट्याच्या हल्ल्यात याच गावात प्राण गमवावे लागले होते. या दुर्घटनेने गावात शोककळा पसरली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागलीे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दोनवाडे गावात जीवराम ठुबे हे आपल्या शेतातील घरात एकटेच राहत होते. रविवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास झोपडीवजा घरात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून ठार मारले आणि त्यांच्या मृतदेहाचा काही मांसल भाग खाऊन प्रेत लगतच्या नाल्याजवळ सोडून दिल्याचे सकाळी उघडकीस आले. सोमवारी सकाळी ८ वाजता ठुबे यांचा नातू सागर हा आजोबांना चहा घेऊन पडवीत आला असता घराच्या उंबरठ्यावर रक्ताचे डाग दिसून आले. आजोबा घरात नसल्याचे बघून सागरने दोनवाडे गावातील घरी येऊन वडील दत्तू ठुबे यांना माहिती दिली. नागरिकांनी मळ्यात धाव घेतली. घरात सांडलेले रक्त बघून त्यांनी नाल्याकडे धाव घेतली. तेथे जीवराम यांचा मृतदेह त्यांना आढळून आला.
पोलीसपाटील संपत वाघ यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे व वनविभागाला तत्काळ घटनेची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत जीवराम ठुबे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, चार मुलगे असा परिवार आहे.

—इन्फो—
तीन पिंजरे तैनात; ट्रॅप कॅमेरे बसविणार
दोनवाडे गावच्या मळे परिसरात बिबट-मानव संघर्ष उभा राहिला आहे. या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या पथकाने तत्काळ शेताच्या बांधालगत तीन पिंजरे अभ्यासपूर्ण पद्धतीने तैनात केले आहे. दोनवाडे मळे परिसरात वनविभाग व इको-एको फाउण्डेशनचे वन्यजीवप्रेमींकडून सर्व पाहणी करून ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार आहे. याद्वारे बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच बिबट हल्ल्यातील काही नमुनेदेखील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी सांगितले.

 

Web Title: Elderly man killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक