कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अजूनही प्रभाव कायम डॉ. भारती पवार : २३ हजार कोटींच्या पॅकेजमधून आरोग्य सुविधा पुरवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 02:01 IST2021-08-28T02:00:38+5:302021-08-28T02:01:01+5:30
नाशिक : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, असेच आरोग्य विभागाला वाटते; परंतु अजून दुसरी लाटच ओसरलेली नाही. केरळ व महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला असून, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या २३ हजार कोटींच्या पॅकेजमधून प्रत्येक युनिटपर्यंत आवश्यक त्या सुविधा पुरवण्यावर भर राहणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी (दि.२७) लोकमत कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी सांगितले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अजूनही प्रभाव कायम डॉ. भारती पवार : २३ हजार कोटींच्या पॅकेजमधून आरोग्य सुविधा पुरवणार
नाशिक : कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, असेच आरोग्य विभागाला वाटते; परंतु अजून दुसरी लाटच ओसरलेली नाही. केरळ व महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला असून, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या २३ हजार कोटींच्या पॅकेजमधून प्रत्येक युनिटपर्यंत आवश्यक त्या सुविधा पुरवण्यावर भर राहणार असल्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शुक्रवारी (दि.२७) लोकमत कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी सांगितले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त नाशिक जिल्हा दौऱ्यावर असलेल्या डॉ. भारती पवार यांनी लोकमत कार्यालयाला भेट दिली. यावेळी डॉ. पवार यांचे स्वागत लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी केले. भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत डॉ. पवार म्हणाल्या, कोरोनाचे संकट अजून संपलेले नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. त्यासाठीच केंद्र व राज्य सरकार मिळून २३ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यात प्रत्येक युनिटला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे, रुग्णवाहिका, कंत्राटी स्वरूपात डॉक्टरची भरती करणे आदी उपाययोजना असणार आहेत. लसीकरणाचेही प्रमाण आता वाढले असून, लोकांमध्ये त्याबाबत जागृती दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांच्या सूचनेनुसार निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेबाबत डॉ. पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रात पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार यासह सर्वच ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात प्रथमच १५ अनुसूचित जाती, २७ ओबीसी आणि ८ आदिवासी जमातीतील व्यक्तींना मंत्रीपदे दिली गेली. हे पहिल्यांदाच घडले. यात्रेत अनेक महिलांनी मला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. आपल्यातलाच माणूस मंत्री झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळाल्याचेही पवार यांनी सांगितले. आरोग्य खात्याचा पदभार सांभाळताना या क्षेत्रातील आव्हाने खूप मोठी असल्याची जाणीव आहे. त्यानुसार मी काम करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: प्रत्येक खात्याबाबत अतिशय सतर्क असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर जाताना अभ्यास करूनच जावे लागत असल्याचेही पवार यांनी सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, सरचिटणीस पवन भगूरकर आदींची उपस्थिती होती.
इन्फो
नाशिक जिल्ह्याची स्थिती बरी
नाशिक जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. मागच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत आरोग्य विभागाने बऱ्यापैकी तयारी केलेली आहे. जास्तीत जास्त ऑक्सिजन, औषधांचे प्रमाण वाढवण्यावर भर आहे. नुकताच मी याबाबत आढावा घेतला आहे. बालरोगतज्ज्ञांशी चर्चा केलेली आहे. जिल्ह्यात २७ पैकी ३ ते ४ प्लांट सोडले तर बाकी प्लांट पाइपलाइनमध्येच आहेत. जास्तीत जास्त ऑक्सिजन सुविधा पुरवण्याविषयी आम्ही दक्ष आहोत. ग्रामीण भागात लसीकरणाचेही प्रमाण वाढवण्यावर भर राहणार असल्याचेही डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.
इन्फो
राज्याकडून अजूनही आकडेवारी नाही
ऑक्सिजनअभावी दुसऱ्या लाटेत किती जणांचे बळी गेले याबाबतची आकडेवारी आरोग्य खात्याने राज्यांकडून मागवली होती; परंतु अद्याप महाराष्ट्रासह कुणीही आकडेवारी दिलेली नाही. १३ ऑगस्टपर्यंत त्यासाठी मुदत दिली होती. केवळ पंजाब सरकारने अपेक्षित बळींची संख्या कळवली आहे; परंतु ती गृहीत धरली जाणार नाही. राज्य सरकार आकडेवारी देत नाही आणि उगाचच केंद्र सरकारला दोष दिला जात असल्याचेही पवार यांनी सांगितले.
इन्फो
लोकमतची ट्रॉफी ठरली लकी
लोकमतने मला २०१९ मधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल उत्कृष्ट संसद सदस्य म्हणून गौरवले होते. त्यामुळेच माझी केंद्रस्तरावर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेत मला मंत्रीपद बहाल केल्याची भावनाही डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली. लोकमतची ही ट्रॉफी मला खूपच लकी ठरली आहे. हा पुरस्कार मला कायम प्रेरणा देत राहील, असेही त्यांनी सांगितले.
भारती पवार यांचा फोटो वापरावा.