महापालिका उभारणार दिव्यांगांसाठी उपचारासह शिक्षण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:45 IST2018-11-15T00:45:29+5:302018-11-15T00:45:55+5:30
दिव्यांगांसाठी शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण आणि उपचार या तिन्ही सुविधा एकाच छताखाली राबविणारा प्रकल्प महापालिकेने आखला असून, येत्या महासभेवर तो सादर करण्यात आला आहे.

महापालिका उभारणार दिव्यांगांसाठी उपचारासह शिक्षण केंद्र
नाशिक : दिव्यांगांसाठी शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण आणि उपचार या तिन्ही सुविधा एकाच छताखाली राबविणारा प्रकल्प महापालिकेने आखला असून, येत्या महासभेवर तो सादर करण्यात आला आहे. मुंबई नाका येथील यापूर्वीच्या किनारा हॉटेल मागील महापालिकेच्या जागेत सतरा कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
नवी मुंबईच्या धर्तीवर हा प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार समाज कल्याण उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेच्या एकूण अंंदाजपत्रकाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. त्या निधीतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
या प्रकल्पात अंध, अपंग, मानसिक विकलांग, कर्णबधिर, गतिमंद अशा सर्वच दिव्यांगांसाठी पहिली ते दहावीपर्यंतची शाळा असणार आहे. त्यासाठी विशेष भौतिक सुविधा आणि विशेष शिक्षकांची नियुक्ती असणार आहे. दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार शास्त्रोक्त शिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे व्यावसायिक प्रशिक्षणदेखील दिले जाणार
आहे. रोजगाराच्या या शिक्षणातून अपंगांना आर्थिक स्वावलंबनासाठी स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचप्रमाणे याच ठिकाणी प्रत्येक दिव्यांगांवर उपचार तसेच विविध उपयुक्त थेरपींचा वापरदेखील केला जाणार आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर ही सुविधा असणार आहे.
सुमारे पंचवीस पदे भरणार
महापालिकेच्या वतीने राबवविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी उपआयुक्त दर्जाचे संचालक नियुक्त केले जातील तसेच शैक्षणिक व्यवस्थापक, शिक्षक अशी सुमारे २५ पदे भरण्याचे नियोजन आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात अपंगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवून त्या माध्यमातून सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, आजवर हा निधी खर्ची पडत नव्हता. गेल्या वर्षी प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिकेत येऊन तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी अखर्चित निधीवरून वाद घातला होता. त्यानंतर महापालिका प्रशासन हालले होते. नाशिक महापालिकेने चालू आर्थिक वर्षात दिव्यांगांसाठी शिक्षणासाठी मदत, प्रौढ दिव्यांगांना निवृत्तिवेतन व भौतिक सुविधा आणि अन्य अनेक योजना राबविल्या आहेत.